Chandrakant Khaire On Shinde Group : शिवसेनेकडून (शिंदे गट) आज राज्यातील महत्वाच्या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीमुळे चर्चेला उधाण आले आहे. कारण या जाहिरातमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे यावरून वेगवेगळ्या प्रतिकिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील यावर प्रतिकिया देतांना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर स्वतःची टिमकी वाजवणारं हे सरकार असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
लाखो-करोडे रुपयांच्या जाहिरात देऊन स्वतःची टिमकी वाजवणारे हे सरकार आहे. मी देखील मोठ्या प्रमाणावर स्वतःची जाहिरात करेन, पण याचा अर्थ असा नाही होत की माझी खूप लोकप्रियता वाढली आहे. जनतेचा जो सर्व्हे झाला होता, भाजपने देखील असा जनतेचा सर्व्हे केला होता. त्यात हे लोकं पूर्णपणे अपयशी ठरत आहे. खोटेनाटे नाटकं करून स्वतःची प्रतिमा वाढवण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. हे सर्व चुकीचे आहे. फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष, हुशार व्यक्तीची लोकप्रियता कमी झाली आणि कमी शिकलेले शिंदे यांची प्रतिमा कशी वाढली. त्यामुळे हा सर्व्हे चुकीचा आहे. तसेच भाजपची प्रतिमा खराब करणारा हा सर्व्हे आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस कुठे गायब झाले होते माहित नाही. मात्र तीन दिवसांनी आता परत प्रकट झाले. प्रकट झाल्यावर अशी जाहिरात दिली असून, हे चुकीचे आहे.
पुढे बोलताना खैरे म्हणाले की, आमच्या शिवसेनेची (ठाकरे गट) मान्यता आजही प्रचंड आहे. अनेकजण सांगतात शिवसेनेची प्रतिमा वाढली आहे. याबाबत एक मोठा नेता बोलला, मी नाव सांगत नाही. यांना आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतो. अनेकजण सर्व्हे करणाऱ्यांना मॅनेज करतात, टिमकी वाजवण्यात काय अर्थ आहे. भाजपच्या जुन्या मित्रांना दाखवावं लागेल शिंदे सोबत गेल्याने तुम्ही डाऊन झालात म्हणून. उद्धव साहेबासोबत असताना तुम्ही मुख्यमंत्री होता. आताची परिस्थिती तुम्हाला आवडेल का..? तुमचे चेहरे पडले आम्ही टिव्हीत बघतो, फडणवीस यांचा चेहरा पडला असल्याचे खैरे म्हणाले.
शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद...
तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच मतभेद चाव्हाट्यावर यायला लागेल आहेत. शिवसेना प्रमुखांच्या नाव घेतात, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणतात. मग बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीत टाकला पाहिजे होता. हे सर्व भाजपकडे तर चालले आहेत असं दिसतंय. शिस्तबद्ध भाजपला भ्रष्टाचार आणि वाचाळवीरपणा कसं आवडत आहे. भाजपला प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर या लोकांना काढावा लागेल. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर बोट ठेवायचा अधिकार कुणालाच नाही. सर्वसामान्य नागरिक आजही उद्धव ठाकरेंची स्तुती करतात. हा सर्व्हे (शिंदेगट) यांनी केलेला आहे. यांच्याकडे चेले चपाटे आहेत ते सर्व्हे करतात. शिंदे गट आणि भाजपमध्ये फाटतंय म्हणून मला आनंद आहे.
काय जाहिरात प्रकरण?
आधीच शिंदे गटात आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अशातच शिंदे गटाकडून आज राज्यातील महत्वाच्या वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या जाहिरातीमुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. कारण या जाहिरातमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: