Tension Between NDA Allies : महाराष्ट्र, हरियाणा आणि तामिळनाडू...देशात एकाच वेळी तीन राज्यांमधे भाजपचे (BJP) मित्रपक्षांसोबतचे संबंध तणावाचे बनले आहेत. महाराष्ट्रात कल्याण लोकसभा सीटवरुन मुख्यमंत्र्यांचे पुत्रच राजीनाम्याची भाषा करत आहेत. तिकडे हरियाणात भाजपसोबत सत्तेत असलेले जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला युतीच्या भविष्यावर चिंता करत आहेत. तर तामिळनाडूत भाजप अध्यक्षांच्या वक्तव्याने दुखावलेल्या एआयडीएमकेने जाहीर निषेध केला आहे. 


एनडीएमधील मित्रपक्षांची संख्या रोडावली


2024 ची लोकसभा निवडणूक आता वर्षभरावर आली आहे. एकीकडे काँग्रेस, आपसारखे, डावे-ममतांसारखे कट्टर विरोधक पाटण्यात 22 जून रोजी एकत्रित येणार आहेत. दुसरीकडे एनडीएच्या गोटात मात्र मित्रपक्षांची संख्या रोडावली आहे. पंजाबमध्ये अकाली, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू, कर्नाटकात जेडीएसला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोबत घेण्यासाठी भाजप चाचपणी करत आहे. पण सध्या जे मित्र आहेत तिथे मात्र प्रत्येक ठिकाणी कुरबुरी ऐकू येत आहेत. 


2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना, अकाली दल हे भाजपचे सर्वात मोठे साथीदार सोडून गेले. एनडीएचं अस्तित्व नेमकं काय याबद्दल प्रश्न उठू लागले. आता 2024 आधी पुन्हा एनडीएचं भविष्य काय असणार याची चर्चा होत आहे. 


भाजपचे मित्रपक्ष सगळीकडेच नाराज का होत चाललेत?



  • हरियाणात जननायक जनता या दुष्यंत चौटाला यांच्या पक्षासोबत युती करुन भाजप सत्तेत आहे. दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री आहेत. पण 2024 ला पुन्हा युती होणार का यावरुन साशंकता आहे.

  • भाजपने सर्वच जागांवर तयारी सुरु केली आहे, तशीच जेजेपीने पण सुरु केली आहे. वेगळं व्हायची वेळ आली तर खुशीने होऊ या दुष्यंत चौटालांच्या वक्तव्याने चर्चा अधिक वाढली आहे.

  • तिकडे दक्षिणेत भाजपचं अस्तित्व फार नाही. पण सत्तेबाहेर असलेला एआयडीएमके हा भाजपचा मित्रपक्ष आहे.

  • पण तामिळनाडू भाजपच्या अध्यक्षांनी मागच्या भ्रष्ट सरकारांबद्दल विधान करताना जयललितांनाही टार्गेट केल्यावर एआयडीएमके खवळलं. एआयडीएमकेच्या नेत्यांनी भाजप अध्यक्षांना जाहीर प्रत्युत्तर दिलं.


मोदी-शाहांच्या काळात भाजपची ताकद वाढली


वाजपेयींच्या काळात भाजपला मित्रपक्षांची गरज अधिक होती. आता मोदी शाहांच्या काळात भाजपची स्वत:ची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यामुळे एनडीएच्या रचनेवर त्याचा परिणाम होणार हे उघड. भाजपने 2019 मध्ये तर स्वत:च्या बळावरच 303 चा आकडा गाठला. पण प्रत्येक राज्यात महत्त्वकांक्षी पद्धतीने विस्तार करताना भाजप आपले मित्रपक्षही दुखावत चालला आहे.


केंद्रीय कॅबिनेट हे शतप्रतिशत भाजप


2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये मित्रपक्षांचे केवळ दोनच खासदार होते. शिवसेना, अकाली दल..हे दोन्ही पक्ष भाजपपासून दूर झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये एकही मित्रपक्षाचा मंत्री नाही. शतप्रतिशत भाजप असं हे केंद्रीय कॅबिनेट आहे. आता 2024 ची लोकसभा निवडणूक जवळ असताना भाजप आपले मित्रपक्षांसोबतचे हे संबंध सुधारण्यावर जोर देतं का आणि कुणाकुणाला आपल्या बाजूला आणण्यात यशस्वी होतं हे पाहावं लागेल.