Maharashtra Political Crisis : ''महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेचे बहुमत आहे. ते फक्त रुसून तिथे गेले आहे. त्यांचा रुसवा फुगवा निघाला की, ते पुन्हा सोबत येतील'', असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर भाष्य करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला असल्याच्या बातमीवर बोलताना ते म्हणाले की, ''मुख्यमंत्री आधीही मोतोश्रीवरून वर्षा बंगल्यावर येत नव्हते. मात्र मधल्या काळात ते येऊन येथे राहिले. कोरोना काळात काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळीही ते वर्षा बंगल्यावर येऊन जाऊन होते. ते तेव्हाही मातोश्री आणि वर्षा बंगल्यावरून काम करत होते. काल ते परत गेले. मला वाटत ते मातोश्रीवर राहूनही कारभार करू शकतात.''


बहुमत सिद्ध करण्याची वेळ जर आली तर महाविकास आघाडी तयार आहे का? 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले की, बाहेर गेलेल्या  कोणी काही दावा केला, तरी तो गुवाहाटीतून केला आहे. मुंबईत नाही. मुंबईत त्यांनी हा दावा केल्यावर त्याचा अभ्यास, टिपणी आणि विचार करू असं, ते म्हणाले.   


सेना आमदारांना विमानाची जुळवाजुळव कोणी केली? 


शिवसेनेतील बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हे शिवसेनेत सुरू आहे. भाजपचा यात हात आहे, असं मला तरी वाटत नाही. अजूनतरी असं काही दिसलं देखील नाही आणि समजलं देखील नाही. ते म्हणाले, एकनाथ शिंदे येथून मुंबईत गेले, तेथून गुवाहाटीला गेले. इतकी सेना आमदारांना विमानाची जुळवाजुळव कोणी केली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: