Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारताच तब्बल 35 पेक्षा अधिक शिवसनेचे आमदार त्यांच्यासोबत गेले आहे. तर दुसरीकडे अनेक शिवसैनिक मात्र अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत असणार असल्याच्या मतावर ठाम आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेना पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते जोमात आहे. जर या आमदारांनी शिवसेना सोडली तर त्यांच्या जागी आपलाच नंबर लागणार अशी अपेक्षा त्यांना लागली आहे.
प्रत्येक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते असतातच. पहिल्या फळीतील नेते जोपर्यंत खुर्ची सोडत नाही तोपर्यंत दुसऱ्या फळीतील नेत्यांचा नंबर लागत नाही हे सुद्धा तेवढच सत्य आहे. आता तालुक्यातील आमदार म्हणजे पहिल्या फळतील नेते समजले जातात. त्यांच्या पक्षप्रमुख आणि महत्वाच्या नेत्यांशी थेट संबध असतो. त्यामुळे तालुक्यातील आमदारकीच्या उमेदवारीसाठी पहिल्यांदा त्यांचा विचार केला जातो. पण शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास दुसऱ्या फळीतील नेते पहिल्या फळीत येतील. त्यामुळे सद्यातरी दुसऱ्या फळतील नेते प्रचंड सक्रीय झाले असून, आपण शिवसेनेसोबतच असल्याच दाखवण्यासाठी धरपड करत आहेत.
नेते पोहचले मुंबईत...
शिवसेना आमदारांनी बंड करताच दुसऱ्या फळतील नेते मुंबईत पोहचले आहे. वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांनी बंड करताच तालुक्यातील शिवसेनेचे संजय पाटील मुंबईत जाऊन धडकले. तसेच आम्ही शिवसेनेसोबतच राहू असं ते म्हणाले. तर दुसरीकडे याच तालुक्यातील दुसरे शिवसेनेचे अविनाश गलांडे यांनी सुद्धा बंडखोरांवर टीका केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदार जर भाजपसोबत गेले तर त्यांच्या जागी पाटील, गलांडे यांच्यासारख्या नेत्यांची वर्णी लागू शकते.
स्थानिक निवडणुकीवर परीणाम...
राज्यातील घडामोडी पाहता याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला पक्ष म्हणून ओळख आहे. असे असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विचारसरणी वेगळ्या असूनही सोबत आले होते. त्यामुळे बऱ्याच निवडणुकीत याचे परिणाम पाहायला मिळाले. त्यामुळे आता शिवसेना-भाजप एकत्र आल्यास त्याचे वेगळे परिणाम सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.