Maharashtra Political Crisis Eknath Shinde : शिवसेनेत आमदारांचे बंड घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे आता आगामी दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. रामटेकचे शिवसेना समर्थक आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे गटाने दुपारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. 


एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत, शिवसेनेचे 35 आमदार दिसत असून 7  अपक्ष आमदार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी आणखी चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आणखी चार आमदार कोण आहेत, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आज, मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरून आणि संतोष बांगर हे मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित आहेत.






मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. 


एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (22 जून) त्यांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला आहे. 


दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अर्ध्या तासात शिवसेना भवनात बैठकीसाठी हजर राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना भवनात बोलवण्यात आलेली ही बैठक तातडीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.