Maharashtra Political Crisis: तब्बल अकरा महिन्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर आज (11 मे) निकाल येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता राहणार की जाणार हे देखील या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अपात्रतेची  टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये मराठवाड्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे मराठवाड्याचे देखील विशेष लक्ष असणार आहे. पैठणचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar), छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat), वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासह धाराशिवच्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये सहभाग आहे. 


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांच्यासोबत मराठवाड्यातील देखील अनेक आमदार सहभागी झाले होते. दरम्यान यातील 16 आमदारांना पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली होती. ज्यात मराठवाड्यातील पाच आमदारांचा सहभाग होता. विशेष म्हणजे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या सुरत, गुवाहाटी व गोवा दौऱ्यात सहभागी होते. त्यामुळे आज येणाऱ्या सत्तासंघर्षाच्या निकालात मराठवाड्यातील या पाच आमदारांवर टांगती तलवार असल्याने ते अस्वस्थ आहेत. 


आमदारांच्या प्रतिक्रिया... 


संदिपान भुमरे: आज सत्तासंघर्षावर निकाल आहे. आम्हाला खात्री आहे, न्यायदेवतावर विश्वास असून निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. कारण 56 आमदारांपैकी 40 आमदार आमच्यासोबत आहे.  त्यामुळे आम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. तर न्यायालय निकाल विधानसभेकडेच पाठवणार असे मला वाटते, असे संदिपान भुमरे म्हणाले. 


अब्दुल सत्तार: ज्या 16 आमदारांच्या बाबत हा निकाल येणार आहेत, त्यात माझा देखील समावेश आहे. मी एकदम निवांत असून, निर्णय आमच्या सारखाच लागेल. जर निर्णय आमच्या विरोधात आला तरीही त्याचे स्वागतच करणार. लोकशाहीप्रमाणे आमच्याकडे 40 आमदार आहेत. मुख्यमंत्री देखील आमच्याच पक्षाचे आहेत. तर पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील आम्हालाच मिळाले आहे. त्यामुळे ही सर्व एकंदरीत परिस्थिती पाहता शंभर टक्के निर्णय आमच्याच बाजूने येणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.


संजय शिरसाट:  उद्या निकाल येणार असून, सर्व काही खुलासे उद्याच होणार असल्याचे शिरसाट म्हणाले. तर उद्याचा निकाल आमच्या बाजूने यावा अशी इच्छा असून, सर्व कायदेशीर बाजूंचा विचार करूनच आम्ही उठाव केला होता असेही शिरसाट म्हणाले. 


रमेश बोरनारे: लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर, निकाल काहीही लागला तरीही आमच्या 16 आमदारांच्याच बाजूने हा निकाल असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 'या' 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला आज