Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. 


एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. 


त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि त्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे या 16 आमदारांचे भवितव्य काय हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. त्यामुळे शिंदे सरकारचे भवितव्य हे आजच्या निकालावर अवलंबून असणार आहे. 


घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे. 


अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?  



  • एकनाथ शिंदे 

  • अब्दुल सत्तार 

  • तानाजी सावंत 

  • यामिनी जाधव

  • संदिपान भुमरे

  • भरत गोगावले 

  • संजय शिरसाट

  • लता सोनवणे 

  • प्रकाश सुर्वे 

  • बालाजी किणीकर 

  • बालाजी कल्याणकर

  • अनिल बाबर

  • संजय रायमुलकर 

  • रमेश बोरणारे 

  • चिमणराव पाटील 

  • महेश शिंदे


घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित


हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण महाराष्ट्रातील प्रकरणाच्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. 


सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. घटनेच्या दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत, असंही म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा: