Ambadas Danve On Sandipan Bhumre : दोन दिवसांपूर्वी सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यावर विकास कामांसाठी 10 टक्के कमिशन घेतल्याचा आरोप झाला असतानाच, आता आणखी एका मंत्र्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या खात्यात मनरेगा अंतर्गत शासनाने 26 हजार 250 टॅब खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा (Tab scam) झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, घोटाळ्याचा आरोप करताना अंबादास दानवे म्हणाले की, संबंधित विभागाचे सचिव नंद कुमार हे परवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी निविदा काढण्याचा झपाटा लावला आहे. रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या खात्यात ही निविदा काढण्यात आली आहे. 26 हजार 250 टॅब खरेदीसाठी 70 कोटी रूपयांची खरेदी निविदा काढली गेली आहे. त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल ऍपप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. वास्तवित केंद्र सरकारने हे मोबाईल अॅपप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी 35 कोटी रूपयांचा खर्च का करण्यात आला असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
तर 1 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार 5 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही. सचिवांना 1 ते 5 कोटी मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना 70 कोटींची निविदा काढण्यात आली त्याचे कारण काय? असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच सचिव नंदकुमार निवृत्त होणार असल्याने अवघ्या 11 दिवसांत निविदा काढली गेली आहे. तर सॅमसंग कंपनीलाच प्राधान्य देऊन या कंपनीलाच काम देण्यासाठी मंत्र्यांचा आग्रह असल्याचा आरोप देखील दानवे यांनी यावेळी केला आहे. तसेच रोजगार हमी योजना या खात्यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप दानवे यांनी करत याची विशेष तपासामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. भुमरे यांच्यावर दानवे यांनी केलेले आरोप गंभीर असून, यावरून विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
कर्नाटकमधील 'कमिशन सरकार'च्या आरोपांनंतर महराष्ट्रातही भाजपच्या मंत्र्यावर 10 टक्क्यांचा आरोप