Seat Sharing In Maha Vikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत, यासाठी जागांची चाचपणी सुद्धा केली जाती आहे. महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस याआधी लोकसभा निवडणुकीत लढलेल्या 22 जागांचा आढावा घेत आहे. तर शिवसेना ठाकरे गट आगामी निवडणुकीत 18 ते 19 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. तर काँग्रेसने सुद्धा लोकसभेच्या तयारीसाठी बैठकीचं नियोजन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडीत कसा समन्वय साधला जाणार? जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असणार? लोकसभेच्या निवडणुकांची तयारी पाहता जागा वाटपामध्ये आघाडीत बिघाडी होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटाकडून किती जागांवर दावा?


महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीनही प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत तयारीला सुरुवात केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 19 जागांवर लक्ष केंद्रित करुन या जागा पुन्हा जिंकण्याचा दावा केला आहे. काँग्रेसने सुद्धा अशाच मतदारसंघाचा आढावा सुरु केला आहे. आता आढावा घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती लोकसभा निवडणुकी संदर्भातील जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे.


मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा निर्णय घेताना हे जागावाटप ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याची कारणं नेमकी काय?



  • लोकसभेच्या 48 जागांचं वाटप समसमान 16-16-16 केले जाणार की मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणत जागावाटपाचा फॉर्मुला ठरवताना प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार

  • जागावाटपांमध्ये महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाच्या मित्र पक्षांना अशाप्रकारे जागा दिल्या जाणार? 

  • याआधीच्या लोकसभा निवडणुकीत 18 जागांवर थेट राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात सामना पाहायला मिळाला होता, त्या अठरा जागांवर मविआ नेमका काय निर्णय घेणार? 

  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जरी जागा वाटपामध्ये समन्वय साधला गेला तरी त्या जागा वाटपाच्या निर्णयावर काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी समाधानी होणार का? राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिक जागांची मागणी होणार


मविआचे नेते कसा समन्वय साधणार?


उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत लोकसभेच्या जागांसाठी काही ठिकाणी तडजोड करावी लागली तर त्यासाठी योग्य समन्वय साधून निर्णय घेतले जातील असं म्हटलं. शिवाय महाविकास आघाडीतील इतर महत्त्वाचे नेते सुद्धा समन्वय साधून जागावाटप केले जाईल असे म्हणत आहेत. मात्र पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एका जागेसाठीची रस्सीखेच पाहता भविष्यात कशाप्रकारे समन्वय साधला जाईल हा प्रश्न आहे


त्यामुळे जागावाटपात डोकेदुखी ठरणारे मुद्दे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती समजून घेऊन जागा वाटपाचा फॉर्मुला कसा ठरवणार आणि ठरवलेल्या फॉर्म्युलावर मविआचे तीन मोठे पक्ष आणि मित्र पक्ष समाधानी होणार का? हे आता जागा वाटपाचं कोडं नेमकं कसं सोडवलं जातं यावरुनच दिसून येईल.


हेही वाचा


Nana Patole : शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमचे घेतलेले उमेदवार परत द्यावेत, नाना पटोले यांची मागणी