Commission Allegation On Atul Save: कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात 40 टक्के कमिशनखोरीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता हाच मुद्दा राज्यात देखील पाहायला मिळत आहे. कारण मराठवाड्यातील एका भाजपच्या मंत्र्यावर विकासकामांसाठी 10 टक्के कमिशन घेतला जात असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हा आरोप आष्टीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर कर्नाटकमधील कमिशनच्या चर्चेनंतर आता राज्यात देखील कमिशनची चर्चा पाहायला मिळत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बीडचे पालकमंत्री तथा राज्याच्या सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अतुल सावे बीड जिल्ह्यात एजंटांमार्फत 10 टक्क्यांनी वसुली करत असल्याचा आरोप आजबे यांनी केला आहे. तर आमच्या कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांना 10 टक्के कमिशन देऊन कामे आणली आहेत असेही आजबे म्हणाले. आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अतुल सावे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालक मंत्रिपद असताना ते पुरेसा वेळ देत नाहीत, जिल्ह्यात कधी येत नाहीत असे यापूर्वी त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यातच आता थेट 10 टक्के कमिशन घेण्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. अजबे यांनी पत्रकार परिषदेतून हे आरोप केले आहेत. 


काय म्हणाले आजबे?


आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलेल्या आरोपांनुसार, अतुल सावे हे एजंट नेमून विकासकामाच्या नावाखाली टक्केवारी जमा करतात. सावे यांनी जिल्ह्यातून कामांसाठी 10 टक्क्यांनी वसुली केली आहेत. तसेच आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी 10 टक्के कमिशन देऊन कामे आणली आहेत. टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम सावे यांनी दिले नाही, असा आरोप आजबे यांनी केला आहे.


जिल्ह्यात नाराजीचे वातावरण? 


तसेच मागच्या महिन्यात झालेल्या अवकळी पाऊस व गारपीटीने बीड जिल्ह्यात शेती आणि मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरे दगावली होती, तसेच अनेकांची घरेही पडली. परंतु असे असताना त्यावेळीही पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला नव्हता. त्यामुळे आधीपासूनच सावे यांच्याबद्दल जिल्ह्यात नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या आमदाराने त्यांच्यावर थेट 10 टक्के वसुलीचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra News: सहकारमंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन् शेतकऱ्याच्या खात्यात 50 हजारांचे अनुदान जमा