Sandipan Bhumre On Aaditya Thackeray: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील सुरु असलेला वाद काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान शिंदे गटाच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी वरळीत घेतलेल्या सभेत बोलताना 'शिंदे गटाचे घोटाळे भाजप उघड करतं' असल्याचा दावा केला होता. तर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) याच आरोपाला आता शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी उत्तर दिले आहे. 'त्यांनी एखादा घोटाळा सिद्ध करून दाखवावे' असे प्रत्युत्तर भुमरे यांनी दिले आहे. 


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून, राज्यभरात सभा घेत आहे. दरम्यान आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील वेगेवेगळ्या भागात ठाकरे गटाकडून राज्यव्यापी निर्धार मेळावे घेतले जाणार आहे. दरम्यान याची सुरवात वरळीतून सुरुवात झाली असून, आदित्य ठाकरेंचा पहिला निर्धार मेळावा वरळीच्या जांबोरी मैदानात पार पडला. मात्र यावेळी बोलताना, 'भाजप आणि शिंदे गटात भांडण लागली असून, भाजपच आमच्याकडे शिंदे गटाच्या घोटाळ्यांची माहिती पुरवत असल्याचे' आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना संदिपान भुमरे म्हणाले की, 'एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा, उगाच चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याचं' भुमरे म्हणाले. 


काय म्हणाले भुमरे? 


दरम्यान आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना भुमरे म्हणाले की, एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा. विनाकारण मित्र पक्ष म्हणायचं आणि वेगळ्या दिशेला न्यायचं काम करायचं. मित्र पक्षाने असं केले तसे केले म्हणत, चुकीची माहिती देऊन गैरसमज करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं भुमरे म्हणाले. 


काय म्हणाले होते आदित्य ठाकरे! 


वरळीच्या जांबोरी मैदानात निर्धार मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, हे सरकार कोसळणार आहे. हे थोड्या दिवसांचं सरकार असून, यांच्यातच भांडण सुरु आहे. उद्या अधिवेशन असून, मी लिहून देतो उद्या जेव्हा आमदार म्हणून विधानभवनात जाऊ तेव्हा यांचाच मित्रपक्ष आमच्याकडे येतात आणि या गद्दारांचे घोटाळे आणून देतात. त्यामुळे या गद्दारांनी देखील समजून घेतलं पाहिजे थोड्या दिवसांचा खेळ आहे. खरं तर त्यांनी विआरएस घेतली आहे हे त्यांना कळलेच नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! शहरांनंतर आता संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार