Imtiyaz Jaleel: गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad District) नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान गेल्या आठवड्यात केंद्राने अखेर औरंगाबादचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' (Chhatrapati Sambhajinagar) करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaz Jaleel) यांनी विरोध केला आहे. तर G-20 परिषदेच्या (G-20 Conference) बैठकीदरम्यान आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र आता त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. "तुम्हारा G20, मेरा T20" असं ट्वीट जलील यांनी केले आहे. विशेष म्हणजे शहरात वेगवेगळ्या देशातील पाहुणे G-20 परिषदेच्या निमित्ताने असल्याने त्यांच्यासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रोजी केंद्राने या दोन्ही शहरांचे नावं बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर जलील यांनी उघडपणे या निर्णयाला विरोध दर्शवत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुंबईत एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याने जलील मुंबईत होते. दरम्यान अधिवेशन संपताच जलील यांनी ट्वीट करत सरकारला थेट इशारा दिला आहे. "तुम्हारा G20, मेरा T20 … जर भाजप खेळ खेळू शकते, तर ते मी पण करु शकतो...” असा इशारा जलील यांनी दिला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या G-20 परिषदेच्या बैठका होत असल्याने वेगवेगळ्या देशातील विदेशी पाहुणे शहरात आलेले आहेत. त्यामुळे अशावेळी जलील यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासन अलर्ट...
दरम्यान जलील यांनी ट्वीट करताच पोलिसांनी याची दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जलील यांच्यासह शहरातील एमआयएमचे महत्वाच्या नेत्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच G-20 पाहुण्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी एमआयएमकडून अचानक आंदोलन केले जाणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे.
काय म्हणाले होते जलील?
शहराचे नाव बदलताच यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, "फडणवीस साहेब हा जिल्हा माझा असून, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्यायचं, ते नाव द्यायचं हा धंदे सुरु आहे का?" अशी टीका जलील यांनी केली. G-20 परिषदेची औरंगाबादमध्ये होणाऱ्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार? मी जगाला दाखवेल की हे घाणेरडे राजकारण करत आहेत. आता फडणवीस गृहमंत्री आहेत ना आता त्यांना सांगतो, मी मोठं आंदोलन उभं करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiyaz Jaleel: जी 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार; नामांतरावरून जलील यांचा इशारा