Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असून, त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली असून, त्यासाठी 2024 ची गरज काय असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? याची राज्यभराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अजितदादांच्या सीएमपदाचं राजकीय गणित मांडलं आहे. 


काय म्हणाले एकनाथ खडसे? 


सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार याचा अंदाज कोणालाही नाही. न्यायालयाचा निकाल आला आणि हे 16 आमदार अपात्र ठरले तर काय परिस्थिती निर्माण होईल. विशेष म्हणजे या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांचे देखील नाव आहे. त्यामुळे आपोआप राज्यातील सरकार कोलमडेल. त्यामुळे ज्यांच्याकडे सर्वधिक बहुमत आहे त्यांना राज्यपालांना बोलवावेच लागणार. एक क्षणात त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. मग अशा कालखंडात जो काही आकड्यांचा खेळ होईल, त्यात महाविकास आघाडीने अजित पवारांना नेतृत्व करण्याची संधी दिल्यास का होऊ शकत नाही, असे खडसे म्हणाले. 


अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत!


अजित पवार भाजपसोबत जातील का?, या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही. या पक्षात त्यांना मान आहे, सन्मान आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच वर्षोनुवर्षे त्यांनी या पक्षात काम करुन पक्ष उभा केला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना भीक घालून ते भाजपसोबत जातील असे मला वाटत नाही. म्हणून अजितदादा असे काही करतील असे वाटत नसल्याचं खडसे म्हणाले. 


फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री? 


एकीकडे अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे भाजपचे नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. 'देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर आजच्या जळगाव येथील सभेतून, उद्धव ठाकरे या वक्तव्यावरुन शिंदे गटावर निशाना साधण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच; भाजप मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापणार?