Sandipan Bhumre On Uddhav Thackeray: निवडणुका आयोगाने (Election Commission) 'शिवसेना' पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय दिला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, यावरुन वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटात आता फक्त बाप-लेक राहतील, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील आमच्या शिवसेनेत येऊन जावं अशी ऑफर देत भुमरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
यावर बोलताना भुमरे म्हणाले की, आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिलाच नाही. गट वैगरे आता काहीच राहिले नाही. त्यामुळे त्यांना आता आमच्याकडे येण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. त्यांचे आता कोणतेही अस्तित्व राहिले नाही. त्यांनी आमच्या शिवसेनेत यावे आता हे मी त्यांना सांगण्यापेक्षा त्यांनीच समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी विचार करावे, आता त्यांच्या पक्षात कोणीच राहायला तयार नाही. जे आहेत ते देखील राहणार नाहीत. ठाकरे गटात आता फक्त दोघेच बाप-लेक राहतील अशी टीका भुमरे यांनी केली आहे.
धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असल्याची अपेक्षा होती
पुढे बोलताना भुमरे म्हणाले की, काल जो काही निकाल आला आहे, तो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला आहे. तर धनुष्यबाण निशाणी आपल्यालाच मिळणार असल्याचा आम्हाला विश्वास होता. 40 आमदार, 13 खासदारसह 10 अपक्ष आमदार आणि अनेक नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत सहभागी झाले होते. त्यामुळे आम्हाला खात्री होती की, धनुष्यबाण आम्हालाच मिळणार आहे. तर पक्षात ठाकरे नसतील असे नाही, कारण बाळासाहेब ठाकरे नाव महत्वाचे आहे. इतर ठाकरेंपेक्षा बाळासाहेब ठाकरे महत्वाचे असून, आमची शिवसेना त्यांची शिवसेना असल्याचं भुमरे म्हणाले.
फक्त सहानुभूतीवर पक्ष आणि राजकारण चालत नसते
तर आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे महत्वाचे असून, इतर ठाकरे असतील किंवा नसतील याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. तसेच उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळण्याचा विषयच नाही. कारण फक्त सहानुभूतीवर पक्ष आणि राजकारण चालत नसते. एकावेळी असे होऊ शकते. पण नेहमीच सहानुभूती मिळत नसते. तसेच यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे काम आणि विचार लागतात तेव्हा कुठे सहानुभूती मिळू शकते. तसेच निकाल आमच्याबाजूने येईल हे मला आधीपासूनच वाटत होते. कारण आमची सत्याची बाजू होती. खरे शिवसैनिक आम्हीच होतो. आम्ही सर्व आमदार-खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने बनलो आहोत. त्यामुळे निर्णय आपल्याच बाजूने लागेल अशी अपेक्षा आम्हाला होती, असे भुमरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: