ShivJayanti 2023: आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरी करण्यासाठी अखेर परवानगी मिळाली असल्याने, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमी नागरिक औरंगाबादसह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आग्रा किल्ल्याकडे आज रवाना होणार आहेत. यासाठी काहींनी विमानाचे तिकीट बुक केले आहेत, तर काही जण रेल्वेने आग्रा गाठणार आहेत. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली आहे. तर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाऊंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थित राहणार आहे.


यावर्षी आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे विनोद पाटील यांनी पुरातत्व खात्याकडे (Archaeological Survey of India) केली होती. मात्र परवानगी नाकारल्याने विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने ही परवानगी दिली आहे. तसेच या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी औरंगाबाद शहरातून आज रेल्वेने शिवभक्त रवाना होणार आहे. यासाठी सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशनवर येण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणाहून विशेष रेल्वेने हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे गाडीमध्ये केवळ औरंगाबादच्याच नाही तर मराठवाड्यातील शिवप्रेमींचा समावेश आहे. याशिवाय विमान, तसेच खासगी वाहनांनी शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे. 


शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार


या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून, या वेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे. आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून, सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात आयोजकांनी तयारी केली असून, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एक स्वतंत्र लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


विनोद पाटलांनी घेतला आढावा...


दरम्यान उद्या 19 फेब्रुवारी रोजी आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आयोजकांकडून तयारी सुरु आहे. दरम्यान यावेळी विनोद पाटील यांनी तयारीचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. तसेच त्यांनी उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित बातम्या: 


Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी