Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेत शिवसेनेत बंडाची हाक दिल्यापासून,शिवसेना आणि शिंदे गटात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे पदाधिकारी सकाळी एकीकडे तर संध्याकाळी दुसऱ्या गटात पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बाँड शपथपत्र लिहून घेतले जात आहे. मात्र आता शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला जात असल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. तर काहींनी आपली निष्टा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. दरम्यान औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी सुद्धा असेच शपथपत्र बाँडवर लिहून दिले होते. सोबतच आपण शिवसेनेसोबतच असणार असल्याचे सुद्धा लिहून दिले होते. मात्र आता अचानक ते शिंदे गटात सामील झाले आहे. स्थानिक नेतृत्वावर आम्ही नाराज असल्याचं कारण देत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आमदार संजय शिरसाट यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मेळाव्याला मेळाव्यातून उत्तर...
शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता टोकाला गेले असून, वरच्या पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता स्थनिक पातळीवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही. त्यातच दोन्ही गटांकडून मेळाव्याला मेळाव्यातून उत्तर दिले जात असल्याचे चित्र औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवाजीनगरमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगचेच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी सुद्धा मेळावा घेतला.
खैरे-दानवेंच्या खांद्यावर औरंगाबादची शिवसेना
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सामील होणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील शिवसेनेत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन महत्वाचे चेहरे उरले आहे. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत सोडले तर संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार यांच्यासह इतर आमदारांनी शिंदे गटात जाने पसंद केले आहे. त्यांच्या याच भूमिकेला पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा समर्थन दिले आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक निवडणुका पाहता शिवसेनेला पुन्हा नव्याने पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.