Maharashtra Politics Issue In Supreme Court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान आज याप्रकरणी सुनावणी पार पडली, मात्र आजच्या युक्तीवादानंतर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, अनिल कपूरचा (Anil Kapoor) डायलॉग मारत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, अनिल कपूरचा 'मेरी जंग' सिनेमा होता. त्याच्यामध्ये त्याने जो  डायलॉग मारला आहे, तारीख पे तारीख,तारीख पे तारीख...जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ नही मिल रहा!, तशीच काही स्थिती या तारखांच्या निमित्ताने निर्माण झाली असल्याचं मला वाटत आहे. हरकत नाही 14 तारीख जरी आली असली. त्यादिवशी का होत नाही, सर्व काही परिस्थिती समोर आहे. पक्षबंदीचा कायदा काय आहे, पक्ष आदेश काय आहे. या सर्व गोष्टी स्पष्ट असतांना, आतातरी 14 तारखेला न्यायालयाने निर्णय द्यावा असे अपेक्षित असल्याचं दानवे म्हणाले आहे. 


आम्ही आमची बाजू मांडू: शंभूराज देसाई


दरम्यान यावर बोलतांना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शेवटी न्यायालयीन प्रकिया आहे. त्यामुळे न्यायालयाकडून जो काही आदेश येतो तो मान्य करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. जर पुढची तारीख मिळाली असेल तर आम्ही आमची बाजू पुढच्या तारखेला मांडू असेही देसाई म्हणाले. तर आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं देखील देसाई म्हणाले. 


पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला 


सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची ही सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान गेल्यावेळी करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या सुनावणीच्या युक्तीवादाचा दाखला दिला. गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. सोबतच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावं, अशी विनंती केल्याची आठवणही देखील सिब्बल यांनी खंडपीठाला करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांची बाजू जाणून घेतली. सर्व बाजू जाणून घेतल्यावर पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचं पाच खंडपीठाच्या न्यायालयाने जाहीर केलं. 


तारीख पे तारीख... सत्तापेच कधी सुटणार? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला