Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra News) जनतेनं पुन्हा एकदा अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अजित पवारांनी उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट आणि दुसरा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा गट. त्यामुळे शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर अनुभवलेल्या सर्व गोष्टी महाराष्ट्र पुन्हा अनुभवतोय. अशातच प्रश्न पडतोय की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? याप्रकरणी आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. एक शरद पवार गटानं दाखल केलेली अजित पवार गटाविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिका आणि दुसरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगातही आज सुनावणी पार पडणारा आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या आज पार पडणार आहेत. एक म्हणजे, शरद पवार गटानं अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आमदार अपात्रतेच्या संदर्भात शरद पवार गटानं एक याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची. आज निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्ह कोणाचं? याबाबत सुनावणी पार पडणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटानं युक्तिवाद करताना, शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, असा आरोप करत परस्पर पत्र काढून ते नियुक्त्या करत होते, असा आरोप केला होता. तर शरद पवार गटानं पक्षाचं चिन्ह गोठवू नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दोन्ही सुनावणींकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. 


शरद पवार गटापाठोपाठ अजित पवार गटही सर्वोच्च न्यायालयात 


शरद पवार गटानंतर अजित पवार गटही सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार गटानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविरोधात अजित पवार गटानं काल (रविवारी)  हे कॅव्हेट दाखल केलं आहे. शरद पवार गटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याआधी अजित पवार गटाची बाजू ऐकून घेण्यात यावी यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. 


निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे : सुप्रिया सुळे


निवडणूक आयोगाचा पेपर आधीच फुटला असून पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांमागेदिल्लीतील अदृश्य शक्तींचा हात असल्याचा घणाघातही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 



एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाची होणारी सुनावणी आणि त्यांचा पक्षाबाबत येणारा निकाल हा देशातील सर्व प्रादेशिक पक्षांवर परिणाम करणारा असणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.