सोलापूर :  मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल वाईट वाटतं. आधी मुख्यमंत्रीपदाचं त्याचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री केले आणि त्यातही आता आणखी एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (NCP Sharad Pawar Faction) गटाच्यावतीने अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप हा मराठी माणसांच्या विरोधातील पक्ष असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 


सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, स्मार्ट सिटी म्हणून पुरस्कार सोलापूरला मिळतो आणि इथं पाणी पाच दिवसानंतर येतं. जोपर्यंत पाणी येत नाही. तोपर्यंत नागरिकांनी पाणीपट्टी भरू नये असे आवाहनही त्यांनी केले. रस्त्यावर उतरायचं असेल तर आयुक्ताच्या केबिनला हंडा घेऊन जाणाऱ्यांमध्ये मी आंदोलकांमध्ये पहिली असेल असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तुम्ही (भाजप) सरकार पाडण्यासाठी आणि आमदार विकत घेण्यासाठी जे पैसे खर्च करता, ते पैसे किमान लोकांना पिण्यासाठी पाणी द्यायला वापरा असेही सु्प्रिया सुळे यांनी म्हटले. दिल्लीतील AS म्हणजे अदृश्य शक्ती. तुम्ही वेगळं अर्थ लावू नका, असेही त्यांनी म्हटले. 


सोलापूरच्या खासदारासाठी पोलिसांत तक्रार करा...


सोलापूरचे खासदार जर पळून गेले असतील तर पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे म्हणत त्यांनी भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी दिल्लीत तर त्यांना पाहिलेलं नाही.  पुढच्या वेळी दिल्लीत गेले की जसं रेल्वेत ओरडतात वडापाव वडापाव तसं मी सोलापूर, सोलापूर ओरडणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 


सोलापूरच्या चिमणीचं काय झालं? चिमणी पडली? विमानसेवा सुरु झाली का? कुठले कुठले विमान सुरु झाले? दिल्ली, मुंबई, पुणे? असा सवालही सुप्रिया यांनी केला. तुम्हाला जर इथे राहणारे खासदार राहणारे हवे असतील. तर चांगले लोकं निवडून द्यावे लागतील. आता पुढच्या वेळी 'इंडिया आघाडी'चा खासदार निवडून द्यायचा आहे. 


भाजपवर निशाणा 


सुप्रिया सुळे यांनी भाजपने दिलेल्या आश्वासनांवर हल्लाबोल केला.  धनगर समजला आरक्षण देतो म्हणाले, दिलं का? लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम सगळे आरक्षण मागत आहेत. त्यापैकी कोणाला आरक्षण दिलं? असा प्रश्न  त्यांनी केला.


कर्नाटकमधील लिंगायत समाजाचे सर्वात मोठे नेते येडियुरप्पा आहेत. पण, भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांचे तिकीट कापले. पुढं काय झालं तर कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला. 


भाजपमध्ये सगळेच वाईट नाहीत


भाजपमध्ये सगळेच नेते वाईट नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. नितीन गडकरी, अटलबिहारी वाजपेयी ही चांगली मंडळी भाजपमधील आहेत. चांगल्या माणसाला चांगल म्हटलं पाहिजे. पण काही मतभेद असतात, सगळेच वाईट नाहीत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आता भाजपमध्ये 2.0 ची आवृत्ती सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. 


भाजप मराठी विरोधातील पक्ष


भाजप हा मराठी माणसाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. मराठी कोण? हे सांगताना त्यांनी जे महाराष्ट्रात आता ते मराठी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या दोन बहिणी कर्नाटकत दिल्या आहेत, त्या स्वतःला कन्नड म्हणतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रमधील सर्व मराठी आहेत. 



तेव्हा तुम्ही कुठे जातं विचारली का?


डॉक्टरला तुम्ही जातं विचारली का? असा सवाल त्यांनी केला. मग आता काय हा प्रश्न करत आहेत. त्याचं कारण आहे अदृश्य शक्ती, पण हे चालणार नाही. 2024 मध्ये आपल्याला पवित्र शक्ती निर्माण करायची आहे. माझी विठ्ठलावर श्रद्धा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.