Maharashtra NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पक्षातील फुटीचं कारण स्पष्ट करताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. हा आरोप करताना त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात आज राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदार आणि समर्थकांच्या मेळाव्यात बोलत होते. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करत छगन भुजबळ यांनी अचानक आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. शरद पवार यांच्या निकटवर्तींयामध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचंही ते म्हणाले.


जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात राजकीय पक्षांमध्ये फूट तेव्हा फुटीर गट हाच आरोप करत आला आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. शिवसेनेतून नारायण राणे किंवा राज ठाकरे यांनी फारकत घेतली तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला गेला. शिवसेनाप्रमुख हे दैवत असल्याचं सर्वच नेते स्पष्ट करत होते. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटातील नेत्यांनीही शरद पवार या पक्षाच्या विठ्ठलाच्या भोवती बडव्यांचा गराडा पडल्याचा आरोप केला.


पाहा व्हिडीओ : Chhagan Bhujbal : साहेब आमचे विठ्ठल, पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, भुजबळांचा निशाणा कुणावर?



अजित पवारांनी बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथा-पालथ झाली. वर्षभरापूर्वी शिंदे गटानं शिवसेनेतून बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तसंच काहीसं आता राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांबाबत दिसतंय. शिवसेनेतील बंडाच्या वेळी जे-जे घडलं ते-ते सगळं पुन्हा एकदा महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या बंडानंतर अनुभवत आहे. बंड केल्यानंतर शिंदे गटानंही आमच्या विठ्ठलाच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे आम्ही वैतागलो होतो, असं म्हटलं होतं. आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या छगन भुजबळांनीही आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरलाय, असं म्हटलं. छगन भुजबळांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा विठ्ठल म्हणजे, शरद पवार. पण शरद पवारांच्या आजूबाजूला असलेले बडवे म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बडवे म्हणजे, नेमकं कोण? छगन भुजबळांचा रोख जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांकडे तर नाही? अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.