मुंबई :  राष्ट्रवादीमध्ये (NCP) अजित पवारांमुळे (Ajit Pawar) मोठं रामायण घडलंय.राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस आहे.  शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप (Whip) जारी करण्यात आला आहे. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही.  दरम्यान अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार  असल्याचा दावा राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) प्रतोद  अनिल पाटील यांनी केला आहे.


40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे 


 आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95   टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.  


बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष


देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठकीला सुरु आहे. अजित पवारांनी आमदारांना आणण्याची जबाबदारी मंत्र्यांना दिली होती.. त्याचा आढावा अजित पवार या बैठकीत घेतला जात आहे.  अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केलीय. तसे व्हिपही बजावण्यात आलेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडलेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केलाय. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवलीय. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.         


हे ही वाचा :


अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयबद्दलल मला काहीही महित नव्हतं, माझ्या वडिलांना अंधारात ठेवलं याचं मला दुःख : सुप्रिया सुळे


मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?