Nashik Sharad Pawar : नाशिकमधून (Nashik) राष्ट्रवादीसाठी मोठी बातमी येत असून  येवल्यातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय रात्री उशिरा त्यांनी शरद पवारांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शरद पवार (Sharad Pawar) यांचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत असून येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याचे समजते आहे. 


अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. आज या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडत आहे. अशातच अनेक जेष्ठ नेते शरद पवारांना पाठिंबा देत असल्याचे समोर येत आहे. यातूनच येवल्याचे राष्ट्रवादीचे जुने नेते म्हणून ओळखले जाणारे माणिकराव शिंदे देखील पुन्हा पक्षात प्रवेश करत शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या ते सिल्वर ओक निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आहेत. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी विरोधात काम केल्यामुळे राष्ट्रवादीतून 2019 साली हकालपट्टी झाली होती. मात्र छगन भुजबळ हेच पवारांच्या विरोधात गेल्याने आज शरद पवारांची भेट घेऊन शिंदे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. 


तर काल जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितल्यानुसार शरद पवार लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून त्याची सुरुवात नाशिक (Nashik) जिल्ह्यापासून होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 8 जुलै रोजी शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांचे पहिले टार्गेट छगन भुजबळ असणार हे या सभेच्या माध्यमातून निश्चित झाले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात 8 जुलैला ही सभा होणार असून येथील राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी पवारांची सिल्वर ओक येथे भेट घेतल्यानंतर येवल्याची सभा ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान भुजबळांच्या विरोधात शरद पवार गटातून माणिकराव शिंदे यांना पुढे बळ दिले जाणार आहे. 


शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यांनतर वातावरण तापले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून आमदारांवर कारवाई केली जात आहे. त्यानंतर लागलीच शरद पवार हे आता महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. आज जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), नागपूर, सोलापूर आदींसह महत्वाच्या जिल्ह्यांचा दौरा शरद पवार करणार असल्याचे म्हणाले आहेत. शरद पवार हे दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.