Maharashtra Cabinet Portfolio : अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेत (शिंदे गट) नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता खाते वाटपावरुनही (Portfolio) तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भूमिका आहे. त्यामुळे खाते वाटपाला आणखी काही दिवस लागू शकतात असंही म्हटलं जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षात चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.  राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. कोणत्या मंत्र्याला कोणती मंत्रिपदे मिळू शकतात ते पाहूयात..


अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती?


अजित पवार : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण


दरम्यान मागील वर्षी शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील नेते मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. अनेकांनी या संदर्भात आपली भावना बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आणि भाजपामधील काही नेत्यांना संधी मिळेल, अशी चर्चा असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या इच्छेवर विरजण पडलं आहे. जी मंत्रिपदं शिवसेना आणि भाजपमधील आमदारांना मिळणार होती, ती आता अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता असल्यचां म्हटलं जात आहे.