Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट सध्या पक्षात पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आमदारांची जमवाजमव सुरु आहे. मात्र असे असतानाच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची सुद्धा जमवाजमव सुरू असल्याचे दिसत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील सध्या 'नॉट रिचेबल' असल्याने ते अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काहींनी सध्या कोणतेही भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अशातच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची जमवाजमव सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी काय भूमिका आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहराध्यक्ष शरद पवारांसोबत?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच, शहराध्यक्ष मात्र शरद पवारांच्या सोबत आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबरच राहणार असल्याचे सोमवारी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी जाहीर केले. तर शरद पवार यांचा त्याग, जनमानसातील त्यांची प्रतिमा लक्षात घ्यायला हवी. या वयात असा त्रास त्यांना व्हायला नको होता. ईडीच्या भीतीने ग्रासलेली व कमर्शियल माइंडची मंडळीच अजित पवार यांच्याबरोबर जातील. मात्र आम्ही शरद पवारांच्याच सोबत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील म्हणाल्या आहेत.
कोण आहेत कैलास पाटील?
राष्ट्रवादीचे विध्यामान जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यावर कैलास पाटील देखील त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत दाखल झाले. पुढे त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. मात्र छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जातात. तर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते आमदार सतीश चव्हाण यांच्या खंदे समर्थक झाले. त्यामुळे भुजबळ व सतीश चव्हाण हे दोघेही अजित पवार यांच्यासमवेत असल्यामुळे कैलास पाटीलही त्यांच्यासमवेतच असणार असल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'औरंगजेबाला मी आदर्श मानतो'; राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ