Maharashtra Monsoon Assembly Session : पालघरमध्ये सुविधांच्या वानवा असल्यामुळे आदिवासी पाड्यातील एका महिलेला आपली जुळी बालकं गमावावी लागल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. आज विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडेबोल सुनावले तसंच प्रश्नही विचारले. आरोग्य सुविधांच्या अभावी बालकांचा मृत्यू होणं ही बाब लाज आणणारी आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच आदिवासी भागातील अडचणी वर्षभरात दूर करुन दुर्दैवाचं दुष्टचक्र थांबवणार का, याचं उत्तर सरकारने द्यावं अशी माझी मागणी असल्याचं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार यांनी पालघरमधील (Palghar) घटनेचा उल्लेख केल्यानंतर, तिथल्या अडचणींचा पाढा वाचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील त्यावर उत्तर दिलं. आदिवासीबहुल भागांमध्ये रस्त्यांची दूरवस्था आणि पूल यांचा सर्वंकष विचार करुन तातडीने उपाययोजना केल्या जातील, जेणेकरुन यापुढे आदिवासी भगिनी किंवा तिच्या बाळाचा मृत्यू होणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


पालघरमध्ये दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीला झोळीतून नेलं, जुळ्या बालकांचा मृत्यू
गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील गरोदर मातेला आपल्या दोन मुलांना उपचाराविना गमवावे लागलं. आरोग्य सुविधा नाहीत, आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे या महिलेवर ही दुर्दैवी वेळ ओढावली. या संदर्भातील बातमी एबीपी माझाने दाखवली होती. विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान अजित पवार यांनी पालघरमधील घटनेचा उल्लेख करत सरकारला प्रश्न विचारले.


सरकार दुर्दैवाचं दुष्टचक्र थांबवणार का? : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, "पालघर जिल्हा एकेकाळी ठाणे जिल्ह्याचाच भाग होता. परंतु ठाणे आणि पालघर वेगवेगळा जिल्हा केला. सध्या असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्याच ठाणे जिल्ह्याला लागून असलेला पालघर जिल्ह्यात काय अवस्था आहे. हा आदिवासी जिल्हा आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असता ना एका आदिवासी पाड्यातील भगिनीवर दुर्दैवी वेळ यावी. तिची घरीच प्रसुती झाली, तिला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये झाली. दुर्दैवाने त्या दोघांचाही मृत्यू झाला. दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नाही. अॅम्ब्युलन्स बोलावली तरी येऊ शकत नाही. हे किती दिवस चालवायचं. किमान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोट्यवधी रुपयांची वेगवेगळी कामं सुरु आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी पायाभूत सुविधांच्या बाबतीत घेतला. त्याबद्दल काही बोलायचं नाही. तेही काम केलं पाहिजे. परंतु रस्ते नसल्यामुळे आदिवासी पाड्यातील या भगिनीला झोळीतून नेण्याची वेळ आली, त्यालाही यश आलं नाही. त्यात दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य खात्याची सोय नाही म्हणून मृत्युमुखी पडतात. ही आपल्या लाज आणणारी बाब आहे. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अशीच दूरवस्था आहे. यासाठी ठोस निर्णय घेऊन वर्षभरात त्यांच्या अडचणी दूर करणार का आणि दुर्दैवाचं दुष्टचक्र थांबवणार का याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे."


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर
"हा विषय गंभीर आहे. अशा घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या. ही घटना दुर्देवी आहे. शासन याबाबत गंभीर आहे. मी विरोधी पक्षनेते आणि सभागृहाला सांगू इच्छितो की अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा शासन उपाययोजना करतं. आदिवासीबहुल भागांमध्ये रस्त्यांची दूरवस्था आणि पूल यांचा सर्वंकष विचार करुन तातडीने उपाययोजना केल्या जातील जेणेकरुन यापुढे कोणत्याही आदिवासी भगिनीचा किंवा तिचा बालकाचा मृत्यू होणार नाही, अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत. ही बाब शासन गांभीर्याने नक्की घेईल आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ," असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.   


Maharashtra Adhiveshan Palghar:एबीपी माझाच्या बातमीचा IMPACT,पालघर प्रश्नावर अधिवेशनात चर्चासत्र