Maharashtra Monsoon Session Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आज दुसरा दिवस सुरु आहे. अधिवेशन म्हटलं की टोलेबाजी आणि जुगलबंदीचा खेळ हा ठरलेला असतो. यात नाव न घेता एकमेकांवर प्रहार देखील केले जातात. काही प्रश्नांवर आक्रमकपणे तर काही प्रश्नांवर हसत खेळत टोलेबाजी करत सरकारकडून उत्तरं काढण्याचा प्रयत्न केला जातो. आज दुसऱ्या दिवशी अशीच जुगलबंदी रंगली ती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात. विषय होता दाढीचा. तो ही राज्यातील काळ्या दाढीचा आणि केंद्रातील पांढऱ्या दाढीचा. भुजबळ आणि फडणवीसांची ही जुगलबंदी पाहून सभागृह मात्र खळखळून हास्यधारेत चिंब झालं.
'नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही'
छगन भुजबळ यांनी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीवर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटलं की, नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. नाहीतर एक मिनिट बोलले तर जीएसटी लावतील. आम्ही पेपरात वाचलं की फडणवीस यांची ताकद वाढली आहे. केंद्राच्या कुठल्या तरी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. जरा तिथे जाऊन सांगा अन्नधान्यावर जीएसटी लावू नका, असं भुजबळ म्हणाले. पुढं बोलताना त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वळवला.
पांढऱ्या दाढीचा प्रभाव हा हिंदुस्थानावर
भुजबळांनी म्हटलं की, तुम्ही मुख्यमंत्री झालात ते मला चांगलं वाटलं. वेगळ्या पद्धतीनं मला चांगली गोष्ट वाटते कारण की हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहेत. पण यांची काळी दाढी आहे. त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव हा हिंदुस्थानावर आहे, असं भुजबळ म्हणाले.
आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो
यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीएसटी संदर्भात जे काही बदल झाले आहे त्यानुसार आपण हे बिल आणलं आहे. भुजबळसाहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण ते आपण विधानसभेत केलं. आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो, असंही फडणवीस म्हणाले.
जीएसटीमधील पळवाट बंद केली
नाना पटोले यांनी म्हटलं की, राजाच्या तिजोरीच्या चाव्या या पहिल्या इकडे (अजित पवारांकडे हात करत) होत्या. त्या आता समोर गेल्या आहेत. अजित दादा आता डोळे मारत आहेत. (यावर दादांनी हात जोडले) शाळेतील पुस्तकांवर ही जीएसटी लावण्यात आला आहे, असं ते म्हणाले. यावर फडणवीस म्हणाले की, जीएसटीमधील पळवाट बंद केली आहे. दूध आणि दही कोणाला विकायाचं असेल त्यावर जीएसटी नाही. नानाभाऊ तुमचं सरकार असताना आम्ही म्हणायचो की पेट्रोल डिझेलचे दर कमी करा मात्र ते तुम्ही केले नाहीत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. कालच सीएनजी वरील कर केंद्राने कमी केला आहे, असं ते म्हणाले.