मुंबई : निवडणुकांचे (Lok Sabha Election)  पडघम वाजू लागले की, या पक्षातून त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारण्याचे प्रकार अनेक नेते करतात... अर्थात, त्यामागे आपण विजयी होऊ हाच हेतू असतो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काही आयाराम आणि गयारामांचं काय झालंय?  नवनीत राणा (Navneet Rana) , उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) , महादेव जानकर, आढळराव, चंद्रहार पाटील, राजू पारवे, बजरंग सोनवणे, रवींद्र वायकर यापैकी बहुतांश उमेदवारांना जनतेने नाकारले.


निवडणुकीच्या आधी मोठ्या झोकात पक्ष बदलले, उमेदवाऱ्या घेतल्या आणि जोरकस प्रचारही केला... मात्र निकालात त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागण्याऐवजी, त्यांच्या पदरात  पराभवाची धूळ पडली आहे.   त्यातलं पहिलं आणि सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे नवनीत राणा... अर्ज दाखल करण्यादिवशी नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला. तिकीट  मिळवलं आणि जोरदार प्रचारही केला.  महत्त्वाचं म्हणजे, प्रचारादरम्यान बच्चू कडू आणि राणांमध्ये जोरदार वादही रंगला. मात्र अखेर नवनीत राणा यांचा पराभव झाला.


उज्ज्वल निकमांचा दारुण पराभव 


विशेष सरकारी वकील असलेले आणि 26/11  सारख्या महत्त्वाच्या केस लढलेल्या उज्ज्वल निकम यांनीही ऐन निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली.


रासपचे महादेव जानकरांचा पराभव


रासपचे महादेव जानकर तर महायुतीचं तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत होते. म्हणून त्यांनी शरद पवारांचाही भेट घेतली. मात्र त्यांना भाजपने ऐनवेळी तिकीट दिले आणि आता त्यांचा पराभव झाला आहे. 


आढळराव पाटलांचा पराभव


शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणुकीच्या आधी   राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं  घड्याळ हाती बांधलं मात्र विजयाची वेळ काही त्यांच्या नशिबी आलीच नाही.


चंद्रहार पाटलांचा पराभव


त्याचसोबत लाल मातीच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन  लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला मात्र विजयाचा उजेड काही त्यांना मिळालाच नाही.


काँग्रेसच्या राजू पारवेंच्या पायात पराभवाचे साखळदंड 


काँग्रेसच्या राजू पारवे यांनी आपल्या आमदाराकीचा  राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत  प्रवेश केला आणि उमेदवारीची माळ गळ्यात पाडून  घेतली मात्र आता त्यांच्या पायात पराभवाचे साखळदंड बांधले गेले आहेत.


एकूणच निवडणुका म्हटलं की त्याच्याआधी आयाराम आणि गयाराम यांची संख्या वाढते. मात्र, वर उल्लेख केलेल्या उमेदवारांचा पराभव हे हेच दाखवून देतो की, रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळ होण्याआधीच दुसऱ्या पक्षात दिसणं हे जनतेलाच मान्य नसावं.


हे ही वाचा :


बहुमताचा मॅजिक फिगर हुकला, मोदींचे आंध्र प्रदेशकडे विशेष लक्ष; चंद्राबाबूंच्या जागा वाढल्या, पुढे काय?