बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या (Bajrang Sonawane) विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. मात्र, 30 व्या फेरीनंतर येथील मतदारसंघातील मतमोजणीचा काही वाद समोर आला होता. त्यावेळी, बीड आणि गेवराई मतदारसंघातून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पंकजा मुंडेंची फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे, आता बजरंग सोनवणेंचा विजय अतिम मानला जात असून बीडकरांचे लोकप्रतिनीधी बनून बजरंग सोनवणेच दिल्लीला जाणार आहेत.
गेवराई, बीड आणि केजमधून बजरंग सोनवणेंना लीड मिळाला असून परळी, आष्टी, माजलगाव मतदारसंघातून पंकजा मुंडेंना आघाडी मिळाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सर्वच फेऱ्यांमध्ये मतदानाची आकडेवारी पाहून निकालाची उत्कंठा अधिकच वाढत होती. मतदार, कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या काळाजातही धाकधूक वाढली होती. अखेर, 32 व्या मतमोजणीच्या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजरंग सोनवणेंना विजयी घोषित केले आहे. तत्पूर्वी शेवटच्या काही फेऱ्या सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती ती मागणी अखेर प्रशासनाने फेटाळून लावली आहे.
केवळ पोस्टल मतदानास नाही, तर बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधीकडून करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने 6000 पेक्षा जास्त मताने बजरंग सोनवणे हे निवडून आल्याचे सांगत, पंकजा मुंडेंनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे.
जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा परिणाम मराठा आरक्षण आंदोलनाचा झाला असून बजरंग सोनवणेंच्या विजयाला हे आंदोलन व जरांगे कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. कारण, ऐन निवडणुकांत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाने बीड लोकसभा मतदारसंघात चांगलाच जोर धरला होता. त्याचा थेट लाभ उमेदवार बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येत आहे.
बीड लोकसभा मतदार संघात कोण कोणत्या फेरीत आघाडीवर ?
पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर
दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर
सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर
सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर
दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर
11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर
12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर
13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर
15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर
18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर
19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर
20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर
21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर
22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर
23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर
24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर
25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर
26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर
27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर
28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर
29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर
30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर
31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती.