Lok Sabha Election Result 2024 LIVE: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) निकाल लागले आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर एनडीएनं (NDA) बहुमताचा आकडा ओलांडला आहे, पण भाजप (BJP) स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असं दिसत नाही. निवडणूक निकालांनुसार, एनडीए 291 जागांसह आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीला (India Alliance) आतापर्यंत 234 जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप 400 चा आकडा पार करण्याचा दावा करत होतं, याउलट इंडिया आघाडी मोठ्या राज्यांमध्ये आपला प्रभाव पाडताना दिसलं. 


उत्तर महाराष्ट्र आणि बंगाल... तिन्ही राज्यात NDAच्या वियजी रथाला ब्रेक 


पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये एनडीएला मोठा धक्का बसला आहे. या तिनही राज्यांमध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळालं असतं, तर आज देशातील चित्र फारच वेगळं दिसलं असतं. या तिन राज्यांत एनडीएच्या उमेदवारांना यश मिळालं असतं, तर पंतप्रधान मोदींचा विजय रथ कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे गेला असता, यात काही शंकाच नाही. 


संसदेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या उत्तर प्रदेशात राहुल-अखिलेश जोडीनं पंतप्रधान मोदींच्या विजयी रथाला ब्रेक लावला आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये ममता-अभिषेक जोडीनं भाजपला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव हिरावलं गेलं. पण तरीही या जोडीनं पक्षाचं नवं नाव आणि चिन्हासह निवडणूक लढवली आणि घवघवीत यश मिळवलं. 


लोकसभा निवडणूक निकालानंतर विरोधी पक्ष अॅक्टिव्ह मोडमध्ये 


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडी अॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचंच इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. आज दिल्लीत ही बैठक पार पडणार असून महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरेही या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. निवडणूक निकालानंतर बोलताना शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, निकालांचे कल पाहून मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सिताराम येचुरी यांच्याशी बोललो. उत्तर प्रदेशमधील कलानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लाला जाणार असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं. भाजपनं निवडणुकीत आमच्या विरोधात अनेक अजेंडे राबवले आणि त्यांच्याकडून आम्ही धडा घेतला असल्याचंही यावेळी बोलताना शरद पवारांनी सांगितलं आहे.


पवार आणि ठाकरेंच्या रणनितीमुळे महाराष्ट्रात महायुतीची वाट अवघड 


दुसरीकडे, जर आपण महाराष्ट्राकडे पाहिले तर ते यूपीनंतरचे दुसरे मोठे राज्य म्हणून उदयास आले आहे, जिथे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशानंतर, महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. लोकसभा निवडणूक 2024 च्या जाहीर झालेल्या निकालांवर नजर टाकली, तर महाराष्ट्रात महायुतीला मोठं नुकसान भोगावं लागलं आहे. तर याउलट महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. 


2019 मध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपनं 23, शिवसेनेनं 18 आणि राष्ट्रवादीनं चार जागा जिंकल्या. महाराष्ट्रात भाजपसाठी शेतकरी आंदोलन आणि मराठा आरक्षण हे मोठं आव्हान राहिलं आहे. विरोधकांनी हा मुद्दा सातत्यानं लावून धरला होता. 


महाराष्ट्रात कोणाला किती जागा? 


आता जर आपण आकडेवारी पाहिली तर, यावेळी भाजपनं महाराष्ट्रात फक्त 9 जागा जिंकल्या आहेत. जर 2019 चा विचार केला तर, भाजपला यंदाच्या निवडणुकीत थेट 13 जागांचा फटका बसला आहे.  अजित पवारांनी काकांची साथ सोडून पक्ष आणि पक्ष चिन्ह मिळवलं आणि एनडीएमध्ये प्रवेश केला. पण, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फारसा करिष्मा दाखवता आलेला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर यश मिळालं आहे. निवडणूक निकालांनुसार, महाराष्ट्रातील काका-पुतण्याच्या लढतीत जनतेनं थोरल्या पवारांच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांच्या पक्षाला 8 जागांवर यश मिळालं. तर महाराष्ट्रातील राजकीय भूकंपांमधील सर्वात मोठा भूकंप म्हणजे, शिवसेनेतील फूट. फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशी उभी फूट पडली. शिंदेंनी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह स्वतःच्या ताब्यात घेतलं. पण लोकसभा निवडणूक मात्र, महाराष्ट्रातील जनतेनं ठाकरेंच्याच बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंनी 7 जागांवर विजय मिळवला. तर, ठाकरेंनी 9 जगांवर घवघवीत यश मिळवलं. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेसनं सर्वाधिक 13 जागांवर विजयी झाली आहे. 


मुंबईकरांचा कौल ठाकरेंनाच


लोकसभा निवडणुकीत ठाकरे फॅक्टर चालला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईत घवघवीत यश मिळवलं. मुंबईकरांनी ठाकरेंनाच कौल दिल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत मुंबईचे किंग ठाकरेच ठरले. ठाकरेंनी मुंबईतील सहापैकी तीन जागा पटकावल्या. मुंबईतील जागांबाबात बोलायचं झालं तर, भाजपला केवळ एकाच जागेवर यश मिळालं आहे. तर, ठाकरेंच्या शिवसनेनं ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई तीनही मतदारसंघात विजय मिळवला. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं बाजी मारली. तर, उत्तर पश्चिममध्ये अटीतटीच्या लढतीत शिंदे गटानं केवळ 48 मतांनी विजय मिळवला.