मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या (Lok Sabha Seats) 48 जागा आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीचं (Mahayuti) जागावाटपाचं चित्र आणि उमेदवार निश्चित झालं असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवणारे तब्बल 16 आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे  7 तर महायुतीचे 7 आमदार लोकसभेच्या रिंगणात आहेत. बहुजन विकास आघाडीचा एक आणि रासपचा एक आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरलाय. 



काँग्रेसचे पाच आमदार लोकसभेच्या रिंगणात


काँग्रेसचे पाच आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.  कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, धारावीच्या आमदार माजी मंत्री वर्षा गायकवाड, चंद्रपूरमधील वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे लोकसभेच्या रिंगणात आहेत. 



रविंद्र धंगेकर पुणे मतदारसंघातून तर, प्रणिती शिंदे सोलापूर, वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई, प्रतिभा धानोरकर चंद्रपूर, बळंवंत वानखेडे अमरावती मतदारसंघातून रिंगणात आहेत. 



भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते सोलापूर, बल्लारपूरचे आमदार मंत्री सुधीर मुनंगटीवार चंद्रपूर तर मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.



शिवसेनेकडून पैठणचे आमदार मंत्री संदिपान भूमरे हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम, काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देऊन आलेले  उमरेडचे आमदार राजू पारवे रामटेक, तर भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव मुंबई दक्षिण मधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.


विधानपरिषदेचे दोन आमदार लोकसभेच्या रिंगणात  


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवारांकडे आले ते अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. महादेव जानकर विधानपरिषदेचे आमदार आहेत. 


हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील सध्या बोईसरचे आमदार असून ते पालघरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.


दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंया लोकसभा निवडणुकीत एकाही आमदाराला उमेदवारी दिलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्यासोबत असलेल्या सर्व खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिलीय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील एकाही आमदाराला लोकसभा निवडणुकीत उतरवलेलं नाही.


संबंधित बातम्या :


Jayant Patil : भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचं इंजिन सोबत घेतलं; जयंत पाटलांचा टोला


''महिलांची डोकी फुटली तेव्हा निषेधसुद्धा नाही, पण बायको उमेदवार असल्याने मनोज जरांगेंची भेट''; ओमराजेंचा घणाघात