Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज (27 डिसेंबर) कर्नाटक (Karnataka) सरकारविरोधात ठराव मांडला जाणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन (Maharashtra Karnataka Border Dispute) हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) वातावरण तापलं आहे. कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याबाबत विरोधी पक्षाकडून ठराव आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. 


महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन काल (26 डिसेंबर) विधानसभेत विरोधकांनी प्रश्न विचारले होते. महाराष्ट्र सरकारने अजूनही कर्नाटक सरकारविरोधात ठराव न मांडल्याने विरोधकांनी टीका केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सभागृहात म्हणाले की, आज ठराव मांडायला हवा होता. त्यावर आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. 


अजित पवार काय म्हणाले होते?


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठराव यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे, असं अजित पवार म्हणाले.


देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर


"मागील आठवड्यात वातावरण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते आज दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. या संदर्भात महाराष्ट्र सरकार तसूभरही मागे हटणार नाही. आपण इंच इंच जागेचा विचार करु. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकारसमोर आपण सीमावर्ती भागातील नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जे करायचं असेल ते करु," असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला दिलं. सोबतच या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांला मान खाली घालावी लागेल अशी कोणात्या बापाची हिंमत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


सीमावासियांसाठी खंबीर, ठराव आणणार : मुख्यमंत्री 


"आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (26 डिसेंबर) दिल्लीत सांगितलं होतं. वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले होते. तिथून मुंबईला येण्यासाठी रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलाताना कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडणार असल्याचं सांगितलं.


महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा कर्नाटक सरकारचा ठराव


कर्नाटकच्या विधीमंडळात 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्रच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकाच्या विधिमंडळात मांडला होता. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसंच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला होता. 


संबंधित बातमी