Supriya Sule PC : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत अमित शाह नक्कीच मार्ग काढतील : सुप्रिया सुळे
Supriya Sule PC : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
Supriya Sule PC : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत (Maharashtra Karnataka Border Dispute) गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान यासह शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या.
अमित शाह यांनी भेटीसाठी वेळ दिला याबद्दल त्यांचे आभार मानते. आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून त्यांनी त्यामधून मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसंच गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे यात केंद्राचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आमची सगळ्याच विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबतची अवमानकारक वक्तव्ये, ईडी सरकारमधील वाचाळवीरांची माहिती गृहमंत्र्यांनी दिली." तसंच ईडी सरकार ज्याप्रकारे त्यांची पाठराखण करण्याचं पाप करतंय हे देखील गृहमंत्र्यांना सांगितल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठराखण करतात'
महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती. आताही माझी विनंती आहे की त्यांनी विरोधकांना बोलावून बैठक घ्यावी. सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत. राज्याच्या हितासाठी कोणतीही कृती करताना ते दिसत नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर 24 तासांत मुख्यमंत्र्यांनी भाष्य सुद्ध केलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठलाही स्टॅण्ड घेत नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा, शिवरायांचा, फुले दाम्पत्याचा अपमान होतो तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठराखण करण्याचं काम करतात.
राज्यपालांविषयी सविस्तर चर्चा, गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत असा विश्वास
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अद्यापही माफी मागितलेली नाही. याविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही राज्यपालांविषयी सविस्तरपणे गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली. गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. राज्याच्या आणि देशाच्या हिताचा निर्णय घेतील, अशी आमची त्यांच्याकडून प्रांजळ अपेक्षा आहे.