नागपूर: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत खांदेपालट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यानुसार नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून त्यांना आता विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त केले जाऊ शकते. तर काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये विश्वजीत कदम,यशोमती ठाकुर,सुनील केदार,विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.


दरम्यान, विधानपरिषदेच्या सभापतीपसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून नगरमधील नेते राम शिंदे यांना विधानपरिषदेच्या सभापतीसाठी रिंगणात उतरवण्यात आले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काँग्रेस पक्षाने अद्याप आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी फॉर्म भरायचा की नाही या संदर्भात काँग्रेस नेत्यांची  थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीला अमित देशमुख, अभिजित वंजारी, बंटी पाटील उपस्थित आहेत, तर इतर नेते थोड्याचवेळात याठिकाणी पोहोचतील. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीवर विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे ठरेल.


नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेतेपद सहजासहजी मिळणार का?


नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास राजी झाले असले तरी ते आता विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यातून तसे संकेत मिळाले होते. नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेता करण्याची चर्चा मी ऐकलेली नाही. तो निर्णय हायकमांड करेल. दिल्ली निर्णय घेईल. 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहे. त्यांच्यासोबत चर्चा होईल, हा निर्णय नाना पटोले यांचा नाही किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. प्रभारी येतील तेव्हा कोणाला गटनेता करायचं याचा निर्णय होईल. तो निर्णय नाना पटोलेचाही नाही आणि विजय वडेट्टीवार यांचाही नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा


विधिमंडळ पक्षनेता होण्यासाठी नाना पटोले राजीनाम्याच्या तयारीत? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं म्हणाले, 'तो निर्णय आम्ही...'