मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती आहे. पक्षातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसमध्ये लवकरच राजीनामासत्र सुरू होण्याची दाट  शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदमुक्त होण्यासाठी दिल्लीत हायकमांडकडे पत्रव्यवहार केल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता नाना पटोलेंच्या (Nana Patole) राजीनाम्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच नाना पटोले यांना विधिमंडळ पक्षनेता होण्यामध्ये रस आहे, म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला आहे का याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केलं आहे. 


 विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, 'मला या संदर्भात माहिती नाही, मी ही चर्चा ऐकलेली नाही. तो निर्णय हायकमांड करेल. दिल्ली निर्णय घेईल. 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहे. त्यांच्यासोबत चर्चा होईल, हा निर्णय नाना पटोले यांचा नाही किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. प्रभारी येतील तेव्हा कोणाला गटनेता करायचं याचा निर्णय होईल. तो निर्णय नाना पटोलेचाही नाही, आणि विजय वडेट्टीवार यांचा ही नाही, असं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) बोलताना म्हणाले आहेत.


विधानसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतर नियोजनाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राजकारणात जय पराजय होत असतो. मात्र हाय कमांड यासंदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे. म्हणूनच प्रभारी येत आहे. चर्चा होईलच, मात्र नव्याने पक्ष उभारण्याची गरज आहेच. हे काही लपून राहिलेले नाही. आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16 पर्यंत खाली आलेलो नाही. आता कुठलीही लाट नसताना आम्ही 16 पर्यंत आलो. हे आश्चर्यकारक आहे. यामागे ईव्हीएमचा कारण आहे की दुसरा काही कारण आहे, हे कालांतराने पुढे येईल. आमची मागणी बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत. 


हिंगोलीतील घटनेवर केलं भाष्य


आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे तुम्ही कितीही पैसे खा. मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा. जर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ येत असेल. तर महाराष्ट्रात सरकार आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सत्ता सरकार येऊन एवढे दिवस झाले, तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री पदांची चर्चा सुरू आहे. तुम्ही आपापसात बसून चर्चा करत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही, त्यामुळे अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.


 मंत्रिमंडळ कुठेही करा, आम्हाला देणं-घेणं नाही


मंत्रिमंडळाचा जे काही होईल ते होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही. कर्जमुक्तीचा पत्ता नाही. कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन हे सत्तेत आले आहे. मंत्रिमंडळ कुठेही करा, आम्हाला देणंघेणं नाही. सरकार आल्यानंतर आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवा. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले आहेत.