Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (17 डिसेंबर) नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. ठाकरे गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. मात्र आमदारांना मार्गदर्शन करण्याआधी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीने नवीन प्रारंभ झाला?, असा सवाल विचारण्यात येत आहे.
भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा शत्रुत्व असे काही नाही. चांगले असेल त्याचे आम्ही समर्थन करू, जे चुकीचे असेल त्यावर टीका करू, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
'एक तर तो राहील किंवा मी', असे आव्हान ठाकरेंनी दिले होते-
'एक तर तो राहील किंवा मी', असे आव्हान ठाकरे यांनी फडणवीसांबाबत दिले होते. ठाकरे यांनी फडणवीस हे राज्याला कलंक असल्याचे विधान नागपुरात केले होते. फडणवीस यांनीही प्रचारकाळात ठाकरेंवर अनेकदा हल्लाबोल केला होता. मात्र कालच्या भेटीनंतर दोघांमधील आरोप-प्रत्यारोप इतक्या टोकाला पोहचला होता, असं काहीच जाणवले नाही.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या-
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने सत्ता मिळवली. राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. त्यानंतर मुख्यमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सन 2019 साली महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आलेली कटुता पुढे पाच वर्षे कायम राहिली. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्याचं दिसून आलं. शिवसेना फुटीमध्ये भाजपच्या आणि खासकरून देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता नवे सरकार आल्यानतंर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.