Maharashtra Cabinet Expansion मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल, अशी माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्याची संभाव्य यादी (NCP Ajit Pawar Cabinet Minister List) एबीपी माझ्याच्या हाती आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या वाट्याला आलेल्या 10 च्या 10 मंत्र्यांच्या जागा भरणार आहे. अजित पवारांनी शपथ घेतली असल्यानं उरलेले नऊ आमदार उद्या मंत्रिपदाचीशपथ घेतील असा अंदाज आहे. संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती लागली असून यामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश नाहीय.
नवाब मलिकांची लेक मंत्री होणार, नरहरी झिरवळांनाही लॉटरी-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रथमच नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे
राज्यमंत्री-
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक
1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार-
शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारीला सुरुवात झाली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
आमदारांच्या निवासस्थानी जंतूनाशक फवारणी-
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानी पालिकेकडून जंतूनाशक फवारणी, 16 तारखेपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. नागपूरमध्ये चिकनगुनिया व डेंग्यूचा प्रकाप नागपूर मध्ये चांगलाच पाहायला मिळाला होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांचे थांबण्याचे ठिकाण असलेल्या आमदार निवास, रविभवन, विधानभवन परिसरात नागपूर महानगर पालिकेकडून जोरदार फवारणी मोहीम सुरू आहे. कुठे पाणी तर साचले नाही, डेंग्यूचा लारवा तर नाही याचा कसून शोध घेतला जात आहे.