कोल्हापूर : भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या 22 जागांवर तसेच अमरावतीमधून नवनीत राणा आणि चंद्रपूरमधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचे 24 जागांवर निश्चित उमेदवार झाले आहेत. मात्र, भाजपची यादी जाहीर होऊनही महायुतीमधील शिंदे गटाची आणि अजित पवार गटातील उमेदवारांची यादी कधी येणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे. 


शिंदे गटातील 12 खासदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब 


मात्र, आता शिंदे गटातील पाठिंबा दिलेल्या खासदारांची उमेदवारी सुद्धा निश्चित झाली आहे. शिंदे यांना साथ दिलेल्या तेरापैकी 12 खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आज (28 मार्च) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर 12 खासदारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. यामध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या कोल्हापुरातील दोन्ही खासदारांच्या समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने हेच रिंगणात असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवल्यानंतर त्यांच्याविरोधातील उमेदवार ठरत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. इतकेच नव्हे तर भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता. मात्र, तीन दिवसांमध्ये चर्चा मागे पडली त्यानंतर अन्य पर्यायांचा शोध सुद्धा भाजपकडून सुरू होता. 


हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपकडून धैर्यशील माने यांच्या विरोधात उमेदवारांचा शोध सुरू होता. या चर्चेतूनच शौमिका महाडिक, विनय कोरे यांची नावे चर्चेत आली होती. मात्र विनय कोरे यांनी अप्रत्यक्षरीत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले होते. शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांची भाजपकडून चर्चा सुरु होती. मात्र, आता शिंदे गटातील दोन्ही खासदारांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होत आहे. 


दोन्ही खासदार महिनाभरापासून गॅसवर  


उमेदवारीबाबत संभ्रम सुरु झाल्यानंतर आणि भाजपकडून सुरु असलेल्या दावे  प्रतिदाव्यांमुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने गॅसवर होते. त्यामुळे उमेदवारीसाठी कोल्हापूर ते मुंबई पळापळ दोन्ही खासदारांची सुरु होती. त्यामुळे दोघांकडूनही उमेदवारीचा दावा करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या