मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) राजकीय नेत्यांनी जोरदार केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीला रोखण्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग सुरु केल्याचे दिसून येत आहे. रविवारी भाजपचे आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी मेळावा घेतला. तर आज थेट भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात भाजपचा मातब्बर नेता गळाला लावलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला तर महायुतीला चांगलं यश मिळाल्याचे दिसून आले. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच कागल विधानसभा मतदारसंघात भाजप नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली. यामुळे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तर इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत असून शरद पवारांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला रोखण्यासाठी खेळी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांचा जयकुमार रावलांच्या मतदारसंघातून हल्लाबोल
काल शरद पवार यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यातून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. येथे एक प्रकारची गुंडगिरी सुरु आहे. माजी मंत्री हेमंत देशमुख सारख्या नेत्याला तुरुंगात टाकण्याचे काम केले. हा सत्तेचा गैरवापर आहे. सरकार लोकांच्या सेवेसाठी असते. काही जणांना सत्तेचा माज आला आहे. त्यांना जागा दाखविण्याचे काम या निवडणुकीत आपल्याला करायचे आहे, असे म्हणत त्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्यावर निशाणा साधला. तर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार, असे म्हटले. तर काही दिवसांपूर्वीच जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कामराज निकम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा जयकुमार रावल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाजनांविरुद्ध तगडा नेता गळाला
तर आज शरद पवारांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपच्या मातब्बर नेत्याला गळाला लावल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान खोडपे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देऊ शकतात. शरद पवारांच्या या खेळीची चर्चा आता संपूर्ण राज्यात होत आहे.
शरद पवारांची ताकद वाढणार?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची ताकद वाढणार असल्याची दिसून येत आहे. कारण राज्यातील बडे नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मदन भोसले, विवेक कोल्हे, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप सोपल, रणजीत शिंदे, रमेश कदम हे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका