मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे तब्बल 250 जागांवर एकमत झाले असून असून दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे दिसून आले. यानंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबत सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे. 


250 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत


आता महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार आहेत. मात्र अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आह. साधारणपणे 250 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. या जागांचे जागावाटप महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.  


विदर्भातील सहा जागांचा तिढा सुटला


तर काल विदर्भातील काही जागांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. मुख्यत्वे करून नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीची चर्चा झाल्याची माहिती आहे. विदर्भातील जागा संदर्भात पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये एकूण 12 जागांवर तिढा होता. बारा पैकी सहा जागांचा तिढा सुटला असून आता उरलेल्या सहा जागांवर पुन्हा एकदा आज महाविकास आघाडीच्या आघाडी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिवाय विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातील जागांवर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा होईल.  


मेरिटनुसार निर्णय घेतला जाणार


विदर्भातील ज्या काही मोजक्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे आणि ज्याची चर्चा सुरू आहे यामध्ये काही जागा या शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक लढत असलेल्या जागा आहेत. ज्यावर काँग्रेसचा दावा आहे. तर काही जागा काँग्रेसच्या ताकद असलेल्या आणि पारंपारिक जागा आहेत येथे ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे काही मोजक्या जागांवर तिढा निर्माण झाला आहे. त्या जागांवर मेरिटनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


38 जागांचा तिढा कायम


महाविकास आघाडीत 250 जागांवर एकमत झाले असून अद्याप 38 जागांचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीत बैठक होणार आहे. या बैठकीत 38 जागांवर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 38 जागांमध्ये काही ठिकाणी 2 पक्ष तर काही ठिकाणी 3 पक्षांचा दावा आहे.  तर अद्याप मुंबईतील जागांचा देखील निर्णय झाला झालेला नाही. त्यामुळे या 38 जागांचा तिढा नेमका कधी सुटणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा


Sharad Pawar: विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी सांगितलं उमेदवार निवडीचं राजकारण