नागपूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात (Pune) वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला. लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. आता या प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांनी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. 


लक्ष्मण हाके यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, माझ्यावर दारू पिल्याचा तुम्ही आरोप केला. मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली. मी रक्ताचे नमुने दिले, युरीन टेस्ट दिली. तुमच्यासारखा भेकड असतो तर मी पळून गेलो असतो. पण हा मेंढपाळाचा, धनगराचा पोरगा आहे. ओबीसीची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही. तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी दिली. हे भेकड आहेत. यांच्यात हिंमत असती तर एकटे माझ्यासमोर आले असते, असा हल्लबोल त्यांनी यावेळी केला आहे. 


लक्ष्मण हाकेंचा छत्रपती संभाजीराजेंवर गंभीर आरोप


या पाठीमागे कोण आहेत? असे विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले की, या पाठीमागे कोल्हापूरचा एक नेता आहे ते म्हणजे संभाजी भोसले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांनी माझ्या अंगावर माणसं घातली. आम्ही त्यांना राजा म्हणणार नाही. महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरती हल्ला करायला लावणारा राजा कसा असू शकतो? हे राज्य कायद्याचे राज्य आहे. इथे लोकशाही आहे. राजेशाही कधीच संपली आहे. त्यामुळे आम्ही असलं कोणाला मानत नाही, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले. 


ओबीसींच्या हक्काची लढाई कुठेही थांबणार नाही


तुम्ही माझ्यावर दारू पिल्याचा आरोप केला. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून महाराष्ट्राच्या वयोवृद्ध नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. या महाराष्ट्राला हे कसे चालते? लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता संविधानाची भाषा करतो. ओबीसींची चळवळ कुठेही थांबवणारा हा कार्यकर्ता नाही. मग तलवारीचे वार झाले तरी चालतील कोणी गोळ्या घातल्या तरी चालेल आणि काहीही झालं तरी चालेल. आमचा जीव गेला तरी चालेल पण ओबीसींच्या हक्काची लढाई कुठेही थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


VIDEO : लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले; हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा, मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी