BJP Leader Controversial Statement : नवी दिल्ली : नवरात्रोत्सव (Navratri Festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच नवरात्रोत्सवात दांडिया रास (Dandiya Raas) खेळण्यासाठी गरबा (Garba) प्रेमींनी कंबर कसली आहे. अनेकांचा गरब्याचा सराव जोरात सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत भाजप नेत्यानं मांडलेल्या अजब कल्पनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या बिगर हिंदूंना रोखण्यासाठी एका भाजप जिल्हाध्यक्षानं (BJP District President) अनोखी कल्पना मांडली आहे. गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं, अशी वादग्रस्त कल्पना इंदूर भाजप जिल्हाध्यक्षांनी मांडली आहे. 


इंदूरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा म्हणाले की, गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं. जर ती व्यक्ती हिंदू असेल तर त्याला गोमूत्र पिण्यास हरकत नाही. कारण आजच्या जमान्यात आधार कार्ड अपडेट होतात. गरब्याला येण्यासाठी लोक डोक्यावर टिळाही लावतात. अशा परिस्थितीत पंडालमध्ये येणाऱ्या लोकांना गोमूत्र पाजल्यानंतरच प्रवेश द्यावा. 


गोमूत्र प्यायल्यानं हिंदूंना कोणतीही अडचण येणार नाही : भाजप जिल्हाध्यक्ष


पत्रकारांनी चिंटू वर्मा यांना गरब्याला येणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले की, गरब्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. लोकांनी तिळा लावून करून गरबा खेळण्यासाठी यावं. त्याचबरोबर गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र प्यायला द्यावं. कारण गाय ही आपली माता आहे आणि आपण तिची पूजा करतो. अशा परिस्थितीत हिंदूंना गोमूत्र पिण्यास कोणतीही अडचण येणार नाही.


गरबा म्हणजे, माता दुर्गेचा उत्सव, मोठ्या संख्येनं उपस्थित राहा : भाजप जिल्हाध्यक्ष


भाजप जिल्हाध्यक्ष पुढे बोलताना म्हणाले की, गरबा हा देवीचा उत्सव. आपण सर्वजण गोमूत्र वापरतो, त्यामुळे प्रत्येकानं ते प्यावं. त्यात कोणाला काय अडचण आहे? आपल्या सर्व माता-भगिनी गरबा खेळायला येतात. दरम्यान, पितृ पक्ष संपणार असून त्यानंतर लगेचच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, अनेक ठिकाणी गरबा नाईट्सचंही आयोजन केलं जातं. 


नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येनं गरबा खेळण्यासाठी लोक एकत्र येतात. मात्र, या काळात अनेकदा महिलांच्या विनयभंगाच्या बातम्या समोर येतात. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गरबा पंडालमध्ये इतर धर्माचे लोक देखील प्रवेश करतात आणि महिला आणि मुलींची छेड काढतात. या घटनांना आळा घालण्यासाठी इंदूरचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी हे वक्तव्य केलं आहे.