नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होईल. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका 2019 ला सोबत झाल्या होत्या मग यावेळी नेमकं काय बदललं हे सांगितलं. 


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर असून महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. 



महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा विषय निवडणूक आयोगासमोर होता. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे. सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहोत. 


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता तिथं पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं पूर्ण झालेली नाहीत.अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.


जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक


जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4  ऑक्टोबरला जाहीर होईल.   


हरियाणात एका टप्प्यात निवडणूक


हरियाणातील 90 जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान  1  ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणात सध्या भाजपचं सरकार आहे. तिथं काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.


संबंधित बातम्या :


Election Commission : हरियाणामध्ये एक तर जम्मू-काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक, 4 ऑक्टोबरला निकाल, महाराष्ट्राच्या निवडणुका कधी? निवडणूक आयोगाची मोठी घोषणा


Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सणांची यादी अन् कारणं सागितली...