सातारा: गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकशाही व्यवस्था कमकुवत केली आहे. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे. त्याचा गंभीर परिणाम माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha) पहायला मिळत आहे. दहशतीच्या जोरावर विरोधी पक्षाला उमेदवार मिळू न देण्याचे षडयंत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भक्कम वैचारिक आणि विश्वासार्ह भूमिका घेऊन माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करत असल्याचे स्वरुप जानकर (Swarup Jankar) यांनी म्हटले आहे. सांविधानिक मूल्यांना प्राधान्यक्रम देण्याची भूमिका घेत असताना खात्रीपूर्वक माढा लोकसभा भाजपमुक्त करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. लोकशाही मोडीत काढून हुकूमशाहीच्या दिशेने वेगवान पावले टाकली जात आहेत. प्रसारमाध्यमांची उघडउघड गळचेपी सुरू असताना न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणले गेले आहे. यापार्श्वभुमीवर प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने आपली योग्य भुमिका निभावणे गरजेचे आहे. त्यात पत्रकार म्हणून तर अधिकची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला रोखण्यासाठी माढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचे ठरवले आहे. सांविधानिक मूल्यांच्या रक्षणाची भूमिका मांडण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन जनतेला देणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या शोषित - वंचित घटकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. राज्यातील जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बहुजन एकतेचा विचार घेऊन मतदारसंघात पोहचणार आहे.


माढ्यात आयटी, ईडीचा वापर


आजमितीला माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार आणि दुसऱ्या फळीतील ९० टक्के पुढारी भाजपच्या बाजूने आहेत. मात्र जनता भाजपच्या विरोधात आहे. भाजप सरकारने यापूर्वीच दोन साखर कारखानदार असलेल्या आमदारांना आयटी, ईडीची भीती दाखवून वळवले आहे. माण आणि फलटण मतदारसंघातील दोघांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यातील एक नेता तर अनुसुचित जातीतला आहे. भाजपच्या नेत्यांची भाषा उन्मत्त झाली असून विरोधात उरलेल्या नेत्यांनाही ईडीची धमकी दिली जात आहे. मतदारसंघातील लोकशाहीचे वातावरण नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा सर्व प्रकार मोडून काढून निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.


पक्ष की अपक्ष, १४ एप्रिलला घोषणा? 


माझ्या राजकीय विचारांवर फुले- शाहू- आंबेडकर- कांशीराम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे या विचारधारेला अनुसरून निवडणुकीतील भूमिका निश्चित करणार आहे. फुले- शाहू- आंबेडकरांचे नाव घेणारे पक्ष आणि उमेदवार माढ्यातही असतील, पण त्यांच्या कृतीशीलतेचा विचार करून पक्ष की अपक्ष, याचा निर्णय आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिलला घेणार आहे. त्याचदिवशी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे. 


चुलत्यांची ती भुमिका मान्य नाही: स्वरुप जानकर


माझे चुलते महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा ऐवजी बारामतीत उभा राहण्याची घेतलेली भुमिका मला पटली नव्हती. जानकर यांना माढ्यात विजय शक्य होता, असे माझे मत होते. त्याशिवाय त्यांनी उभारलेल्या चळवळीचे नुकसान मला दिसत होते, म्हणून मी माढा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. तो माझा भावनिक निर्णय होता. त्यावेळी त्य़ांना बारामतीत मित्रपक्षांचा त्रास होऊ नये, म्हणून अर्ज परत घेतला होता. आता २०२४ निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर, काही दिवसांपुर्वी माझी आणि चुलत्यांची भुमिका वेगळी आहे, असे मी जाहीर केले होते. चुलत्यांनीही ती भूमिका मान्य केली आहे. यावेळी चुलत्यांना माढ्यात वातावरण चांगले होते, पण त्यांनी परभणीत जायचा निर्णय घेतला. ही भूमिका मला व्यक्तीशः पटलेली नाही. पण यावेळी वैचारिक भूमिकेतून माढा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.


त्या धनगर उमेदवाराची प्रतिक्षा


महाविकास आघाडीकडून माढा मतदारसंघात धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विचार केला तर महाराष्ट्रातून एकही धनगर खासदार लोकसभेला निवडून गेलेला नाही. राज्याचा विचार केला तर धनगर समाजाची सर्वाधिक संख्या माढ्यात आहे. त्याबरोबर सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहाची मतदारसंख्या 10 लाखांच्या वर आहे. त्यामुळे खरंच माढ्यात महाविकास आघाडी धनगर उमेदवाराला संधी देतेय का, याची मलाही उत्सुकता आहे. 


आणखी वाचा


स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर पाच कोटींचे मालक, अनेक जिल्ह्यात शेतजमीनी