ठाणे : यंदा राज्यातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Election). श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचं नाव जरी अद्याप जाहीर झालं नसलं तरी त्यांच्या विरोधात कधी आदित्य ठाकरे, कधी सुषमा अंधारे तर कधी केदार दिघे यांच्या नावाची चर्चा झाली. पण उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी धक्कातंत्राचा वापर करून फारशा चर्चेत नसलेल्या वैशाली दरेकर राणेंची (Vaishali Darekar Rane) उमेदवारी जाहीर केली. प्रतिष्ठेच्या बनलेल्या कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी देण्यामागे उद्धव ठाकरेंचं गणित काय? वैशाली दरेकरांची नेमकी ताकद किती याची आता चर्चा रंगू लागली आहे. 


ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना दिलेली उमेदवारी म्हणजे महायुतीला बाय दिला असल्याचा टोला भाजपने लगावला आहे. वैशाली दरेकर यांनी याआधी देखील कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची ताकद माहित आहे असा टोलाही भाजपने लगावला आहे. त्यामुळे खरोखरच ठाकरेंनी या कल्याण लोकसभा मतदारसंघात बाय दिला आहे का यावर चर्चा सुरू आहे.


ठाकरेंच्या मनात काय? 


कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून महायुतीत सध्या वाद सुरू असल्याचं दिसतंय. एक तर ठाण्याची जागा द्या, किंवा कल्याणची जागा द्या असा आग्रह भाजपकडून शिंदंना करण्यात आल्याची माहिती आहे. ठाण्याची जागा ही शिंदेंच्या घरची जागा, तर कल्याणमध्ये त्यांचे पुत्र खासदार. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गोची झाल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे ठाणे आणि कल्याण या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. 


दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे धरून ठाकरे गटाकडून राजकारणाचे फासे टाकण्यात येत होते. कोणत्याही परिस्थितीत श्रीकांत शिंदेंना पराभूत करायचंच हा हिशोबाने या ठिकाणी आदित्य ठाकरे, केदार दिघे आणि सुषमा अंधारे यांच्या नावावर खल झाला. 


कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून मोठा चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण वैशाली दरेकर राणे यांना संधी देऊन ठाकरेंनी धक्कातंत्राची खेळी खेळली आहे. उमेदवारीच्या चर्चेत नाव नसतानाही वैशाली दरेकरांना संधी दिल्याने एकाच वेळी शिवसेना शिंदे गट, भाजपला धक्का बसल्याचं चित्र आहे. 


वैशाली दरेकरांची ताकद किती? 


शिवसेनेच्या फुटीनंतर वैशाली दरेकरांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2009 साली राज ठाकरेंसोबत गेलेल्या वैशाली दरेकरांनी मनसेच्या चिन्हावर कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली आणि लाखांच्या वरती मतं घेतली होती. 2010 ला कल्याण डोंबिवली मनपामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून आपली कारकिर्द गाजवली.  त्यानंतर त्यांनी 2016 साली पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला.


कल्याणमध्ये मोठा जनसंपर्क आणि ठाकरे गटाची मोठी ताकद या जोरावर वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांना चांगली लढत देतील अशी चर्चा आहे. 


ही बातमी वाचा :