मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदे गटाकडून बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali)  यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील या गुरुवारी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता भावना गवळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


भावना गवळी या गेल्या काही तासांपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते, असे भावना गवळी यांचे म्हणणे होते. परंतु, तरीही एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांचा पत्ता कट करुन राजश्री पाटील यांना यवतमाळची उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयानंतरही भावना गवळी यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही.


भावना गवळी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे भावना गवळी यांनी सांगितले. त्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करुन अर्ज भरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भावना गवळी यांनी खरोखरच अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास राजश्री पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.


भावना गवळींचे सर्व प्रयत्न फोल ठरले


यवतमाळ-वाशिममधून आपले तिकीट कापले जाणार याची कुणकुण भावना गवळी यांना आधीच लागली होती. त्यामुळे गेल्या  काही दिवसांपासून भावना गवळी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय भेटीगाठी घेत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भावना गवळी बुधवारी सकाळपासून मुंबईत ठाण मांडून होत्या. यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मुंबईत निर्णय होणार, याची जाणीव गवळी यांना होती. त्यामुळे भावना गवळी शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आपले तिकीट वाचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बुधवारी संध्याकाळी शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश देण्यात आला आणि भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.


आणखी वाचा


मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या चार खासदारांना धक्का! हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट, आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार?