Madhukar Pichad Profile in Marath : राज्याच्या राजकारणातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर राहिला आहे. राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर काम केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी शरद पवारांना साथ दिली. ज्यामध्ये ते 7 वेळा आमदार राहिले आहेत. एकुणात पंचायत सभापती ते मंत्री असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेला नेता आज आपल्यातून निघून गेला आहे.
मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
मधुकरराव काशिनाथ पिचड
जन्म दिनांक : १ जून १९४१
जन्म : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे
वडील : प्राथमिक शिक्षक
शालेय शिक्षण : गावी
माध्यमिक शिक्षण :, संगमनेर
पदवी शिक्षण : फर्क्युसन महाविद्यालय, पुणे / पुढे एल.एल.बी. चे दोन वर्षे केले. येथेच राष्ट्र सेवा दलाशी संपर्क आला. महाविद्यालयीन निवडणूकांत सहभाग.
थोर विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक प्रा. ग. प्र. प्रधानांशी संपर्क, त्यांच्या विचारांचा पगडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करावे म्हणून प्रोत्साहन मिळाले. त्यांच्याच प्रेरणेने नोकरीच्या फंदात न पडता सार्वजनिक जीवनात प्रवेश, काँग्रेस प्रवेश, महाविद्यालयात असतांनाच, आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलनात सक्रीय सहभाग, १९६१ ला पहिला लढा,
सहकारी तत्त्वावर पहिली दूध संस्था राजूर येथे काढली, पहिल्या दिवशी २५ ते ३० लिटर दूध गोळा झाले. पुढे हाच धंदा तालुक्याचा प्रमुख बनला आहे, आज तालुक्यात २ लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना, याच संस्थेच्या अनेक आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, वसतीगृहे आहेत, अकोले तालुक्यात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसची पाळमुळे रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेस हा व्यापारी धनीकांचा पक्ष आहे ही प्रतिमा नाहीशी केली. व सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या प्रवाहात आणले.
जिल्हा परिषद सदस्य : १९७२ ला निवडून आले.
सभापती : १९७२ ते १९८० पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती. सभापती असतांना १९७२ च्या दुष्काळात अहोरात्र काम केले. मेडिकल कॅम्पचे आयोजन, गाव तेथे रस्ता, तलाव या योजना राबविल्या.
विधानसभा सदस्य : १९८० ला विधानसभेवर निवडून गेले. आमदार झाले.
समितीवर निवड : १९८० ते १९८५ विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख म्हणून काम केले.
राज्यमंत्री : जून १९८५ ते १९८६ राज्यमंत्री
२७ जून १९८८ ते १२ मार्च १९९० कृषी, रोहयो, आदिवासी विकास, दुग्ध विकास, पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९६ आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री याच दरम्यान मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ आदिवासी विकास सहपशुसंवर्धन व दुग्ध, मत्स्य विकास मंत्री,
सप्टेंबर १९९४ ते नोव्हेंबर १९९४ आदिवासी विकास,परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री
राजीनामा : २४.११.१९९४ रोजी गोवारी हत्याकांडाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर अधिवेशनात मंत्रीपदाचा राजीनामा
संस्थापक अध्यक्ष : १९९३ मध्ये अगस्ति सह. साखर कारखान्याची स्थापना केली.
विधानसभा विरोधी पक्ष नेते : २५ मार्च १९९५ ते २५ जुलै १९९९ विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी यशस्वी पेलली. कॅबिनेट मंत्री : १९ ऑगस्ट १९९९ ते ऑगस्ट २००४ आदिवासी विकास, विशेष सहाय्य मंत्री
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेवर ७ ऑक्टोबर २००१ रोजी निवड
प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड कॅबिनेट मंत्री : ११ जून २०१३ रोजी आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड