पुणे: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election 2024) मध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. महायुतीमध्ये एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने 57 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसला 41 इतक्या जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात लागलेले निकाल पाहिल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक विरोधी पक्षांतील नेते निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यानंतर विरोधकांनी निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM)वर नाही, तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली होती, त्यानंतर महायुतीतील नेत्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. मात्र, आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यास तयार आहोत. निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे, असं रामदास आठवले म्हणालेत. तर निवडणुकीत महायुतीला मोठा यश मिळालं आहे. निवडणुकीत आम्ही संविधान, ईव्हीएम मशीनलामध्ये आणलं नाही , विरोधकांनी आणलं. मात्र, त्याचा फायदा होणार नाही, संविधान बदलाचा प्रचार यंदा चालला नाही. दलितांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं. महायुतीचे सरकार प्रत्येकासाठी काम करणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास देखील आठवलेंनी व्यक्त केला आहे.
महाविकासआघाडीचे नेते शपथविधीला अनुपस्थित
काल(गुरूवारी) राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य बडे नेते, खासदार, आमदार, महाराष्ट्रातील आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं,, मात्र, काही नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्यांच्या मनात मोठा राग आहे. पण आमच्या मनात विकासाची आग आहे. आता ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकारण करतायेत. काल त्यांनी शपथविधीला उपस्थित राहायला हवं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की, आम्हाला प्रेरणा मिळते स्फूर्ती येते. बाबासाहेबांनी विश्वशांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दलितांच्या न्यायासाठी आपला देश एक राहिला पाहिजे, प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेबांचा मोठा गर्व आणि अभिमान आम्हाला आहे. ज्या रिपब्लिकन पक्षासाठी बाबासाहेबांनी लढा दिला, तो पक्ष पुढे नेण्याची आत्ता माझ्यावर जबाबदारी आहे. बाबासाहेबांना राजकारणात आणू नका. बाबासाहेब देशातील 140 कोटी जनतेचे आहेत, असंही रामदास आठवले पुढे म्हणालेत.