Madhukar Pichad passed away : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज (दि.6) निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दरम्यान, मधुकर पिचड यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. "सर्वसामान्य घरातून येऊन राज्याच्या राजकारण व समाजकारणात मधुकररावांनी ठसा उमटवला. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागणीसाठी, शेवटच्या माणसाच्या हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता अशी मधुकरराव पिचडजी यांची ओळख होती", अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दु:ख व्यक्त केलंय. 


आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली : शरद पवार 


माझे जुने सहकारी मधुकरराव पिचड यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन मधुकर पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले : देवेंद्र फडणवीस 


भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.


महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली : अजित पवार 


माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड साहेबांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. 


भूमिपुत्रांचा कैवारी हरपला...- एकनाथ शिंदे 


ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व जणू संपले. आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकररावांनी साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. त्यांचे सारे राजकारण आदिवासी बांधवांच्या कल्याणाभोवतीच राहिले. काही काळ ते ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्यातला आदिवासींचा सजग कैवारी मला जवळून पाहायला मिळाला. मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. राज्यात विकासाचं नव युग सुरु झालेलं त्यांना पाहायला मिळालं असतं, तर फार बरं झालं असतं. पण नियतीपुढे काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.


आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारा एक हिरा निखळला-  छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधिमंडळातील माझे जुने सहकारी, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. व्यक्तिगत माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 


भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर सोबत आलेले एक महत्वाचे सहकारी आणि पक्षातील तत्कालीन आम्हा महत्वाच्या शिलेदारांपैकी ते एक होते. १९९५ ते १९९९ या काळात पिचड साहेब विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी आणि मी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळेस शिवसेनेचे सरकार होते आणि सरकारला अक्षरशः आम्ही सळो की पळो करून सोडले होते. ते माझ्या मोठ्या भावासारखे होते,वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. 


नाशिकमध्ये त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मी नुकतीच रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांचे पुत्र वैभव पिचड आणि डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर काही दिवसांच आलेल्या या बातमीमुळे मनाला तीव्र दुःख झाले आहे. ही बातमी समजताच वैभव पिचड यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे मोठ्या बंधूसमान असलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला मी कायमचा मुकलो आहे. तसेच त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजातील एक महत्त्वाचा नेता कायमचा काळाच्या पडद्याआड गेला असून आदिवासी समाजाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगात मी व संपूर्ण भुजबळ कुटूंब पिचड कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच स्व. मधुकरराव पिचड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Madhukar Pichad passed away : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास