पंढरपूर: पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला माढा महायुतीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते-पाटील घराण्यात स्पर्धा होती. परंतु, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात दान टाकले होते. त्यामुळे मोहिते-पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी रामराजे नाईक निंबाळकर नाराज झाले होते. माढा लोकसभेत (Madha Lok Sabha Constituency) रणजितसिंह नाईक निंबाळकरांना या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्त्वाकडून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.
याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक पार पडली होती. या बैठकीला रामराजे निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीनंतर माढ्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा रामराजेंचा विरोध मावळला, अशी चर्चा सुरु झाली होती. रामराजे निंबाळकर यांनी माढ्यात एक पाऊल मागे घेतले, असे छातीठोक दावे करण्यात येत होते. परंतु, या बैठकीच्या काही तासांनंतर रामराजे निंबाळकर यांचा फोटो असलेले एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रकातला मजकूर पाहता रामराजे निंबाळकर यांचा माढ्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा विरोध कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रामराजे निंबाळकरांच्या पत्रकात नेमकं काय म्हटलं?
अफवांवर विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार व मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माढा लोकसभा संदर्भात बैठक झाली यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली. परंतु मी माझे स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असे सांगितले.
यावेळी माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आ. जयकुमार गोरे, सातारा जि. परिषद मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण नगर परिषदचे मा. नगरसेवक अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटलांकडून प्रचाराला सुरुवात
भाजपने माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. या जागेसाठी भाजपचेच आमदार धैर्यशील मोहिते-पाटील इच्छूक होते. परंतु, भाजपने रणजतिसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे नाराज झाले आहे. अशातच त्यांना रामराजे निंबाळकर यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे भाजप माढ्यातील उमेदवार बदलणार अशी चर्चाही सुरु झाली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आता धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावांना भेट दिली होती.
आणखी वाचा
माढा लोकसभा भाजपचाच, लोकांना संभ्रमित करू नका; रणजित निंबाळकरांचे रामराजे निंबाळकरांना प्रत्युत्तर