सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Election) 2019 मध्ये भाजपने जिंकून घेतला असून हा मतदारसंघ भाजपचाच आहे, लोकशाहीमध्ये कोणी दावा करणे गैर नसले तरी वैयक्तिक टीकाटिपण्णी करून वातावरण गढूळ करणे आणि लोकात संभ्रम निर्माण करणे थांबवावे असे चोख उत्तर भाजपचे खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar)  यांना दिलं आहे.


माढा लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची बैठक रामराजे निंबाळकर यांनी पंढरपूरमध्ये घेतली होती. त्यानंतर 6 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची घोषणा केली होती. माढा लोकसभा मतदारसंघात माढा, करमाळा आणि फलटण या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने आम्ही मतदारसंघावर दावा करणार असल्याचे रामराजे निंबाळकर यांनी सांगितले होते. 


राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा रणजित निंबाळकरांना पाठिंबा 


यातील माढा आणि करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे यांनी यापूर्वीच उघडपणे भाजप खासदार रणजित निंबाळकर यांच्यामागे उभे राहून 2 लाखाच्या फरकाने विजयी करण्याची घोषणा केली आहे. यावर रामराजे यांनी बोलणे टाळत बबनदादा शिंदे देखील राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे सांगितले आहे. 


रामराजे वि. रणजित निंबाळकर वाद जुना


माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा जुना वाद आहे. गेल्या निवडणुकीत रणजित निंबाळकर याना पराभूत करण्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपने ही जागा मोठ्या फरकाने जिंकली होती. यावेळी माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे कनिष्ठ बंधू संजीवबाबा निंबाळकर इच्छुक असून यासाठी माढा लोकसभेची जागेवर राष्ट्रवादीचा दावा करण्याची खेळी रामराजे निंबाळकर यांनी खेळली आहे. 


मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळा आमदार संजयामामा शिंदे यांनी आपली ताकद यापूर्वीच भाजपच्या मागे उभी केली आहे. 


आता राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा करण्याची खेळी महायुतीत वाद वाढवणारी ठरणार आहे. असं असलं तरी माढा भाजपचाच असल्याचा दावा खासदार रणजित निंबाळकर यांनी केला असून याचा निर्णय भाजप घेईल असे सांगत राष्ट्रवादीचा दावा फेटाळला आहे. सध्या माढा लोकसभेसाठी भाजपमधून विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघे इच्छुक असताना अचानक राष्ट्रवादीच्या दाव्याने नवा वाद समोर आला आहे . 


ही बातमी वाचा: